पुणे – पुणे जिल्हा परिषदेने महिला आणि बालकल्याण विभागाच्या निधीतून इयत्ता ८ वी ते १० वी पर्यंतच्या अनुमाने २ सहस्र ५०० मुलींना स्वसंरक्षण आणि शारीरिक विकासाचे प्रशिक्षण देण्यास चालू केले आहे. जिल्हा परिषदेने प्रशिक्षणावर अनुमाने २५ लाख रुपये खर्च केले आहेत. हा पहिला टप्पा असून पुढील वर्षी उर्वरित गावांतील आणखी मुलींना प्रशिक्षण दिले जाणार आहे, असे जिल्हा परिषदेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी विविध संस्थांकडून७ प्रस्ताव आले आहेत. प्रत्येक तालुक्यातील मुलींची निवड करून ज्युडो आणि ‘कराटे’च्या ७२ प्रशिक्षणवर्गांचे आयोजन करण्यात येणार आहे. कराटे प्रशिक्षणाचा वर्ग हा सलग ९० दिवस चालू असणार आहे. एका प्रशिक्षणवर्गात ३५ मुलींचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील २ सहस्र ५०० मुलींची निवड झाली आहे. अशासकीय संस्थांनाही (एन्.जी.ओ.) त्यांच्या निधीतून मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशा प्रकारे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील मुलींना स्वसंरक्षण प्रशिक्षण दिले जाणार आहे.
महिला आणि बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जमसिंग गिरासे म्हणाले की, मुलींना स्वसंरक्षण शिकवणे आवश्यक आहे. याचा जिल्ह्यातील मुलींना चांगला लाभ होईल. मुलींच्या सक्षमीकरणाच्या दिशेने हे एक पाऊल आहे. आम्ही अशासकीय संस्थांनाही प्रशिक्षण देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन करत आहोत.
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील म्हणाले की, मुली स्वसंरक्षणासाठी स्वतः सक्षम होणे आवश्यक आहे. त्यांच्यामध्ये स्वसंरक्षणाचा आत्मविश्वास निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी हे प्रशिक्षण उपयोगी ठरणार आहे.
संपादकीय भूमिका :पुणे जिल्हा परिषदेचा अभिनंदनीय निर्णय ! याचे अनुकरण अन्य ठिकाणीही केल्यास मुलींवरील अत्याचारांचे प्रमाण अल्प होण्यास निश्चित साहाय्य होईल ! |