दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप :

ठाणे येथे दिव्यांग पूरक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होणार !

ठाणे – वाहनांच्या वर्दळीमुळे दिव्यांग आणि दृष्टीहीन यांना रस्ता ओलांडणे अडचणीचे ठरते. त्यांना कुणावर तरी अवलंबून रहावे लागते. वाहतूक सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून ठाणे महापालिका आणि ठाणे शहर वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील तीन हात नाका सिग्नलवर प्रायोगिक तत्त्वावर दिव्यांग पूरक (हँडीकॅप ॲक्सेसेबल) सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी दिली.


हत्येतील आरोपीला २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी !

कल्याण – येथील १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी अटक केलेला आरोपी विशाल गवळी आणि त्याला साथ देणारी त्याची पत्नी साक्षी यांना २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. ‘हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा’, अशी मागणी पोलिसांनी केली आहे. विशालवर अनेक गुन्हे नोंद असून तो अनेकदा कारागृहात गेला; पण मानसिक रुग्ण असल्याचा त्याच्याकडील पुरावा दाखवून तो जामिनावर बाहेर यायचा.


ठाणे येथे ‘गृहनिर्माण संस्थां’चे महाअधिवेशन !

ठाणे – येथे प्रथमच होणार्‍या ‘गृहनिर्माण संस्थां’च्या महाअधिवेशनाला २८ डिसेंबर या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित रहाणार आहेत. राज्याचा सहकार विभाग आणि ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन यांचा संयुक्त उपक्रम असलेले हे अधिवेशन २७ ते २९ डिसेंबर या कालावधीत ठाण्यातील उपवन परिसरातील मैदानात होणार आहे. या महाअधिवेशनाला ३० सहस्र सहकारी गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत.


आज कंत्राटी कामगारांचा महापालिका मुख्यालयावर मोर्चा !

नवी मुंबई – ‘समान काम समान वेतना’साठी कंत्राटी कामगार नवी मुंबई महापालिका मुख्यालयावर २७ डिसेंबर या दिवशी मोर्चा काढणार आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेत कंत्राटी पद्धतीवर ८ सहस्र ५०० कामगार काम करत आहेत. त्यांना ‘समान काम समान वेतन’ देण्याचे निर्देश माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार अभ्यास करून अहवाल सादर करण्यासाठी समिती नेमण्यात आली; परंतु अद्याप निर्णय घेतलेला नसल्याने ‘समाज समता कामगार संघा’च्या वतीने बेलापूर रेल्वे स्थानक ते पामबीच किल्ला येथील पालिका मुख्यालयापर्यंत हा मोर्चा काढला जाईल.