पणजी, २६ डिसेंबर (वार्ता.) – पर्वरी येथे राष्ट्रीय महामार्गाच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जात आहेत. आम्हालाही हा रस्ता हवा आहे; मात्र आमची आस्था असलेले श्री खाप्रेश्वर देवस्थान आणि वड यांना हानी पोेचवून आम्हाला हा विकास नको आहे, असे मत स्थानिक नागरिक शंकर फडते यांनी व्यक्त केले आहे. आझाद मैदान येथे ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी श्री खाप्रेश्वर देवस्थानचे अध्यक्ष कार्तिक कुडणेकर, कल्पना मोरजकर, कीर्ती कुडणेकर, सुहास मोरजकर, वासुदेव च्यारी, आवेर्तिन मिरांडा, दीपेश नाईक आदींची उपस्थिती होती.
शंकर फडते पुढे म्हणाले, ‘‘आम्ही हा विषय केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मांडला आहे अन् त्यांनी यावर योग्य तो तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. आमचा विरोध हा केवळ श्री खाप्रेश्वर देवस्थान आणि वड यांच्या संवर्धनासाठी आहे अन् यामध्ये आमचे कोणतेही राजकारण नाही. रस्त्याच्या बाजूला ज्यांचे उद्योग किंवा दुकाने आहेत त्यांनी न्यायालयात जाऊन आपल्या मालमत्ता वाचवल्या आहेत. या रस्त्याच्या बांधकामासाठी वडाचे झाड आणि देवस्थान हटवण्यात येणार आहे; मात्र ते न हटवता काम करणे शक्य आहे.’’ या वेळी कल्पना मोरजकर म्हणाल्या, ‘‘श्री खाप्रेश्वर देवस्थान हे अतिशय जागृत देवस्थान आहे, तसेच तेथील वडाची नागरिक पूजा करतात. आम्ही देवस्थान किंवा वड स्थलांतरित करू देणार नाही. आजपर्यंत जेवढे वड स्थलांतरित केले, त्यातील किती वड जगले आहेत? असा प्रश्न आहे.’’