पणजी, २६ डिसेंबर (वार्ता.) – ‘दयानंद सामाजिक सुरक्षा योजने’च्या लाभार्थींचे पहिले सर्वेक्षण नुकतेच पार पडले आहे. यामध्ये वय वर्षे ८० किंवा त्याहून अधिक वयाच्या लाभार्थींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये एकूण २६ सहस्र लाभार्थींपैकी सुमारे ४ सहस्र लाभार्थी मृत पावले आहेत किंवा ते दिलेल्या पत्त्यावर रहात नाहीत. ‘दयानंद सामाजिक सुरक्षा योजने’च्या लाभार्थींच्या पहिल्या सर्वेक्षणाला ऑक्टोबरमध्ये प्रारंभ झाला होता. या सर्वेक्षणाचा ८० टक्के भाग आतापर्यंत पूर्ण झाला आहे.
सर्वेक्षणाविषयी माहिती देतांना समाजकल्याण खात्याचे संचालक अजित पंचवाडकर म्हणाले की,
१. या सर्वेक्षणाचे ‘खरा लाभार्थी’, ‘संशयास्पद लाभार्थी’, ‘मृत पावलेला लाभार्थी’, ‘घरचा पत्ता न सापडलेला लाभार्थी’ आणि ‘स्थलांतरित लाभार्थी’ असे पाच भाग करण्यात आले आहेत.
२. योजनेचे खरे लाभार्थी शोधण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात येत आहे.
३. ‘दयानंद सामाजिक सुरक्षा योजने’च्या लाभार्थीच्या पहिल्या सर्वेक्षणात ४ सहस्र लाभार्थींचा थांगपत्ता लागलेला नाही; मात्र यातील काहींना अनेक महिने ते काही वर्षे योजनेचा लाभ मिळत होता. ज्या लाभार्थींचा पत्ता सापडलेला नाही, त्यांना यापुढे योजनेला लाभ मिळणार नाही.
४. लाभार्थींना योजनेचा लाभ घेण्यासाठी खात्याला ‘लाईफ सर्टीफिकेट’ सादर करणे आवश्यक आहे.
५. यापुढे दुसर्या टप्प्यात ७५ ते ८० वर्षे वयोगटातील, तिसर्या टप्प्यात ७० ते ७५ वर्षे वयोगटातील, चौथ्या टप्प्यात ६५ ते ७० वर्षे वयोगटातील, तर पाचव्या टप्प्यात ६० ते ६५ वर्षे वयोगटातील लाभार्थींची पडताळणी करण्यात येणार आहे.
६. लाभार्थींचा मृत्यू झाल्यास संबंधित कुटुंबियांनी त्यासंबंधीची माहिती खात्याला त्वरित देणे आवश्यक आहे.’’
संपादकीय भूमिकासरकारने कितीही समाजहितैषी योजना आणल्या, तरी त्यांचा उपयोग करणारे समाजातील विविध घटक त्याचा दुरुपयोगच घेतांना दिसतात. तसेच यातून सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यातील भ्रष्टाचाराची कल्पनाही येते ! समाजाची नीतीमत्ता किती खालच्या थराला गेली आहे, हे कळण्यासाठी हे उदाहरण पुरेसे नव्हे का ? |