|
सिंधुदुर्गनगरी – महाराष्ट्रात हत्या, दरोडे, बलात्कार, घरफोडी आदी गंभीर स्वरूपाचे ४७ गुन्हे नोंद असलेला आणि राज्यातील सर्व पोलीस यंत्रणा शोधात असलेला आटल्या उपाख्य अतुल ईश्वर भोसले (वय २७ वर्षे) या गुन्हेगाराला सिंधुदुर्ग पोलिसांच्या पथकाने अहिल्यानगर येथून अटक केली. येथील न्यायालयाने भोसले याला २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
कणकवली येथे १९ डिसेंबर २०२४ या दिवशी ३ लाख २६ सहस्र रुपयांच्या दागिन्यांची चोरी झाल्याच्या प्रकरणात पोलीस भोसले याच्या शोधात होते. या गुन्ह्यात अन्य २ नातेवाईक साथीदारांचा समावेश असून त्यांचाही शोध पोलीस घेत आहेत. सी.सी.टी.व्ही.चे चित्रीकरण आणि हाताचे ठसे यांच्या आधारे सिंधुदुर्ग पोलिसांनी अहिल्यानगर येथील कर्जत भागातून त्याला अटक केली. जिल्ह्यासह राज्यातील अन्य गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्यामुळे येथील चौकशी पूर्ण झाल्यावर भोसले याला राज्यातील अन्य पोलीस ठाण्याकडे वर्ग केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिली.