मालवण – येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा नव्याने उभारण्यात येणार आहे. या पुतळ्याच्या पायाभरणीच्या कामाचा प्रारंभ २५ डिसेंबर या दिवशी करण्यात आला.
राजकोट येथे उभारण्यात आलेला पुतळा कोसळला होता. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली होती. त्या वेळी सरकारने येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा पुन्हा उभारण्याचे घोषित केले होते. त्यानुसार निविदा प्रक्रिया राबवून ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार आणि त्यांचा मुलगा अनिल सुतार यांच्या ‘राम सुतार आर्ट क्रिएशन्स प्रा.लि.’ या आस्थापनाला येथे ६० फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचे काम देण्यात आले आहे. या आस्थापनाने यापूर्वी गुजरात राज्यात ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे काम केलेले आहे.
कास्य धातूपासून बनवण्यात येत असलेल्या या नवीन पुतळ्याच्या डोक्यापासून पायापर्यंतची उंची ६० फूट असणार आहे, तर पुतळा उभारायच्या चौथर्याची उंची ३ मीटर आहे. निविदेनुसार १०० वर्षे टिकेल असा पुतळा बांधण्याची आणि १० वर्षे पुतळ्याची देखभाल आणि दुरुस्ती करण्याची अट घालण्यात आली आहे.