सातारा, २६ डिसेंबर (वार्ता.) – जम्मू-काश्मीर येथील पूंछ भागातील नियंत्रण रेषेजवळ बलनोई परिसरात २४ डिसेंबरच्या सायंकाळी भारतीय लष्कराचे वाहन खोल दरीत कोसळले. या अपघातामध्ये ५ सैनिकांचा मृत्यू झाला. त्यामध्ये ११ मराठा रेजिमेंटमध्ये कर्तव्यावर असणारे सातारा जिल्ह्यातील कामेरी गावचे सुपुत्र सैनिक शुभम समाधान घाडगे (वय २८ वर्षे) यांचा मृत्यू झाला.
हुतात्मा शुभम यांचे प्राथमिक शिक्षण कामेरी येथे, तर माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण मिलिटरी अपशिंगे येथे झाले. शुभम यांच्या जाण्यामुळे कामेरी गावासह पंचक्रोशी आणि संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. शुभम यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी आणि भाऊ असा परिवार आहे.