गायीचा गोठा आणि मोकळ्या जागेत फळबागा दाखवून छत्रपती संभाजीनगर येथील २१ सहस्र शेतकर्‍यांचे खोट्या विम्यासाठी आवेदन !

‘प्रधानमंत्री पीक विमा योजने’तील फसवणूक उघड !

  • शेतकर्‍यांनी ‘प्रधानमंत्री पीक विमा योजने’चा गैरवापर करणे अयोग्य आहे. अशा शेतकर्‍यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !
  • जनतेला धर्मशिक्षण नसल्यामुळे प्रत्येक जण चुकीच्या मार्गाने पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतो, हे गंभीर आहे !

छत्रपती संभाजीनगर – नैसर्गिक संकटांमुळे पिकाच्या हानीपासून शेतकर्‍यांना भरपाई देण्यासाठी अवघ्या १ रुपयात विम्याची सुविधा देणार्‍या ‘प्रधानमंत्री पीक विमा योजने’त अपप्रकार झाला आहे. विम्याच्या लाभापायी गायीचा गोठा आणि मोकळ्या शेतात पीक अन् फळबागा लावल्याचे दाखवत २१ सहस्र ३८३ शेतकर्‍यांनी विम्यासाठी खोटे आवेदन (अर्ज) केले आहे.

एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १० सहस्र शेतकर्‍यांनी फळबागा आणि पिके नसतांना, तर ११ सहस्र ३६९ शेतकर्‍यांनी अधिकचे क्षेत्र दाखवून विम्यासाठी आवेदन केले आहे. यामुळे २१ सहस्र ३८३ शेतकर्‍यांचे ५ सहस्र ५७० हेक्टरवरील बनावट आवेदन रहित करण्यात आले आहे. हिवाळी अधिवेशनात पीक विमा घोटाळ्याविषयी चर्चा झाली होती. पीक विम्यासाठी पीकपेरा (स्वयंघोषणापत्र), ७/१२ आणि ‘८ अ’मध्ये भूमीच्या मालकीची माहिती हे ३ आवेदन ‘ऑनलाइन’ सादर करावे लागतात. दावा करेपर्यंत पडताळणीची सोय नसल्याने शेतकरी भरेल ती माहिती ग्राह्य धरली जाते. यामुळे हे प्रकार घडत असल्याचे तज्ञ सांगतात.