पणजी, २६ डिसेंबर (वार्ता.) – केंद्र सरकारने इयत्ता पाचवी आणि आठवी यांसाठीचे उत्तीर्ण धोरण रहित करण्याचा निर्णय घेतला आहे. गोवा सरकार केंद्राचे हे धोरण गोव्यात चालू वर्षी किंवा पुढील शैक्षणिक वर्षी लागू करू शकते; मात्र यासाठी केंद्राने राज्य सरकारला अधिकृतपणे यासंबंधी आदेश दिला पाहिजे. तसे झाल्यास गोव्यात (इयत्ता पाचवी ऐवजी) इयत्ता चौथी आणि आठवी यांसाठी हे धोरण लागू होईल, अशी माहिती शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे यांनी दिली आहे. शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे पुढे म्हणाले,‘‘उत्तीर्ण धोरण रहित करण्याचा केंद्राने आदेश दिल्यानंतर शिक्षण खात्याला स्थानिक शैक्षणिक संस्थांना याविषयी विश्वासात घ्यावे लागणार आहे, तसेच राज्यातील ‘शिक्षण हक्क कायद्या’च्या (‘आर्.टी.ई.’च्या – ‘राईट टू एज्यूकेशन अॅक्ट’च्या) नियमांमध्ये दुरुस्ती करावी लागणार आहे. या प्रक्रियेला राज्य सरकारची अनुमतीही आवश्यक आहे.’’