एकोशी येथील सरकारी शाळेची भूमी बळकावली

शिक्षण खात्याची म्हापसा उपविभागीय दंडाधिकार्‍यांकडे तक्रार

पणजी, २६ डिसेंबर (वार्ता.) – भूमी बळकावल्याच्या प्रकरणाचे लोण आता सरकारी प्राथमिक शाळेपर्यंत पोचले आहे. राज्यातील पहिल्या सरकारी प्राथमिक शाळांपैकी एक असलेली हळर्ण-एकोशी येथील शाळेची भूमी काही व्यक्तींकडून बळकावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या शाळेची भूमी बळकावल्याची तक्रार शिक्षण खात्याने म्हापसा उपविभागीय दंडाधिकार्‍यांकडे नोंदवली आहे. या तक्रारीनंतर उपविभागीय दंडाधिकार्‍यांकडून या प्रकरणाचे अन्वेषण केले जात आहे.

याविषयी माहिती देतांना शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे म्हणाले, ‘‘साल्वादोर द मुंद येथील सरकारी प्राथमिक शाळेच्या भूमीत अतिक्रमण झाल्याची तक्रार शिक्षण खात्याला मिळाली होती. त्या तक्रारीची संबंधित तालुका शिक्षण अधिकारी कार्यालयाकडून पडताळणी करण्यात आली. शिक्षण अधिकार्‍याकडून अहवाल मिळाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी पुढे नेण्यात आली आहे. सरकारी शाळेच्या भूमीत कुणालाही अतिक्रमण करू दिले जाणार नाही.’’