|
नागपूर – २७ डिसेंबर या दिवशी दुपारी १२.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘स्वामित्व योजने’चा शुभारंभ होणार आहे, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथील पत्रकार परिषदेत केली. या योजनेमुळे कायदेशीर भूमीधारकांची मालकी सिद्ध होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रीमंडळ सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातील ३० जिल्ह्यांच्या ठिकाणी हा महाशुभारंभ होणार आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीद्वारे या स्वामित्व अर्थात् मालमत्ता कार्डाच्या महावाटप शुभारंभाच्या वेळी मार्गदर्शन करणार आहेत’, असे बावनकुळे यांनी सांगितले.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वामित्व’ योजना घोषित केली असून त्याद्वारे राज्यातील ३० जिल्ह्यांतील ३० सहस्र ५१५ गावांतील मालमत्ताधारकांना ‘डिजिटल प्रॉपर्टी कार्ड’ मिळणार आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायती स्वयंपूर्ण होण्यासाठी साहाय्य होईल. गावांतील भूमींचे योग्य प्रकारे वाटप झाल्याने ग्रामपंचायतींना करआकारणी सुलभरित्या करता येईल. यामुळे ग्रामपंचायतींच्या उत्पन्नात वाढ होईल’, असेही ते म्हणाले.