पणजी, १९ सप्टेंबर (वार्ता.) – करासवाडा, म्हापसा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी म्हापसा येथील नागरिक नायजल फोन्सेका, आलेक्स फर्नांडिस आणि लॉरेन्स मेंडिस यांना कह्यात घेतले होते. पोलीस अन्वेषणामध्ये संशयितांनी गुन्ह्याची स्वीकृती दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी विटंबना केलेल्या पुतळ्याचे तुकडे आणि गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेला दगड कह्यात घेतला आहे. पोलिसांनी प्रत्यक्षदर्शीची साक्ष (जबानी) नोंदवली आहे. पोलिसांना ‘सीसीटीव्ही फूटेज’ मिळाले आहेत; मात्रे त्यामध्ये घटनेविषयी अधिक माहिती नाही.
शिवप्रेमींकडून पोलीस अधिकार्यांचा सन्मान, तर उपअधीक्षकांकडून शिवप्रेमींचे आभार !
करासवाडा, म्हापसा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या घटनेचा योग्यरित्या छडा लावल्यामुळे शिवप्रेमींनी पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी आणि पोलीस निरीक्षक सीताकांत नायक यांचा सन्मान केला. शिवप्रेमींनी प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांना सात दिवसांचा अवधी दिला होता; मात्र पोलिसांनी प्रकरण घडल्यानंतर २ दिवसांतच संशयितांना कह्यात घेतले. संयम बाळगून पोलिसांना सहकार्य केल्याबद्दल पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी शिवप्रेमींचे आभार व्यक्त केले.