गोवा : राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याच्या प्रकरणी नाझारियो डिसोझा यांच्या विरोधात गुन्हा नोंद

सामाजिक माध्यमात राष्ट्रध्वजावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सरड्याच्या रूपात दाखवल्याचे प्रकरण

राष्ट्रध्वजावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सरड्याच्या रूपात दाखवले !

पणजी, १७ ऑगस्ट (वार्ता.) – सामाजिक माध्यमात राष्ट्रध्वजावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सरड्याच्या रूपात दाखवल्याच्या प्रकरणी जुने गोवे पोलिसांनी सांताक्रूझ, पणजी येथील नागरिक नाझारियो डिसोझा याच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट केला आहे. पोलिसांनी राष्ट्रीय प्रतिष्ठेचा अवमान प्रतिबंधक कायदा, भारतीय दंड संहितेचे कलम ५०० अंतर्गत (अवमान केल्याच्या प्रकरणी शिक्षा) आणि ‘पी.आय्.एन्.एच्.’ कायद्याचे कलम २’ या अंतर्गत गुन्हा प्रविष्ट केला आहे.

नाझारियो डिसोझा याने स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सामाजिक माध्यमात उपरोल्लेखित आक्षेपार्ह ‘पोस्ट’ प्रसारित केली. स्थानिक पंचायतीचे पंचसदस्य इनासियो पेरेरा यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी ही कारवाई केली.

(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही राष्ट्रीय भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून एका राष्ट्रद्रोह्याने केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. –  संपादक)

पोलिसांनी नाझारियो डिसोझा याला अन्वेषणासाठी बोलावले आहे. सामाजिक माध्यमातून गोव्यातील आर्चबिशप यांचा अवमान केल्याच्या प्रकरणी नाझारियो डिसोझा याच्या विरोधात यापूर्वी एकदा गुन्हा नोंदवला गेला आहे.