राष्‍ट्रध्‍वजाचा अवमान रोखण्यासाठी मुलुंड येथील नायब तहसीलदारांना निवेदन !

डावीकडून कु. ईश्‍वरी गुजर, श्री. रमेश गुप्‍ता, अधिवक्‍ता संतोष दुबे, श्री. रमेश घाटकर आणि निवेदन स्‍वीकारतांना नायब तहसीलदार सौ. अवंती मयेकर

मुंबई – स्‍वातंत्र्यदिनानिमित्त मोठ्या प्रमाणात प्‍लास्‍टिकचे ध्‍वज, मुखपट्टी, ध्‍वजाच्‍या रंगातील कपड्यांची विक्री होते. शासनाचा आदेश डावलून काही विक्रेते प्‍लास्‍टिकच्‍या ध्‍वजांची विक्री करतात. अशा विक्रेत्‍यांवर कारवाई करावी आणि शाळा, महाविद्यालयात ‘राष्‍ट्रध्‍वजाचा सन्‍मान राखा’ हा उपक्रम राबवण्‍यासाठी आदेश देण्‍यात यावेत, अशा आशयाचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने मुलुंड येथील नायब तहसीलदार सौ. अवंती मयेकर यांना देण्‍यात आले. या वेळी तहसीलदारांनी ‘याची खरी आवश्‍यकता आहे, तुमचे कार्य चांगले आहे’, असे सांगितले. निवेदन देतांना भाजपचे मुलुंड जिल्‍हा सचिव श्री. रमेश गुप्‍ता, विश्‍व हिंदु परिषदेचे जिल्‍हा विधी प्रमुख अधिवक्‍ता संतोष दुबे यांच्‍यासह समितीचे कार्यकर्ते उपस्‍थित होते.

मुंबईत आतापर्यंत ५ पोलीस ठाणी, ३ महाविद्यालये, ४ शाळा आणि २ शिकवणीवर्ग येथे समितीच्‍या वतीने वरील विषयांची निवेदने देण्‍यात आली. या वेळी समितीच्‍या कार्यकर्त्‍यांसह स्‍थानिक राष्‍ट्रप्रेमीही सहभागी झाले होते.