गोव्यात ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतरविरोधी कायदा करा !

पणजी येथे ‘हिंदु जनसंघर्ष मोर्चा’द्वारे मागणी

पणजी – गोव्यात लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांच्या विरोधात कठोर कायदे करण्याची मागणी पणजी येथे १२ ऑगस्टला काढण्यात आलेल्या ‘हिंदु जनसंघर्ष मोर्चा’द्वारे करण्यात आली. ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’च्या अंतर्गत समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी या मोर्च्याचे आयोजन केले होते.

पणजी येथील आझाद मैदान येथून ‘हिंदु जनसंघर्ष मोर्चा’ला राष्ट्रीय बंजरंग दलाचे गोवा अध्यक्ष श्री. नितीन फळदेसाई यांच्या हस्ते धर्मध्वजाच्या पूजनाने प्रारंभ झाला. यानंतर मोर्चा पुढे एम्.जी. मार्ग, डॉन बॉस्को सर्कल, जुने शिक्षण खाते, कॅफे आराम या मार्गाने गेल्यानंतर मोर्च्याची शेवटी आझाद मैदानात सांगता झाली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित केले.

पणजी शहरातून मार्गक्रमण करत असतांना मोर्चा

केंद्रशासनाने राज्यसभेत गोव्यातून वर्ष २०१९ ते २०२१ या २ वर्षांच्या कालावधीत १ सहस्र ४७१ महिला आणि ७९ मुले गायब झाल्याचे सांगितले आहे, तसेच गोवा सरकारने मागील साडेतीन वर्षांत गोव्यातून ८२९ महिला आणि मुले गायब झाल्याचे आणि यातील ६९५ जणांचा शोध लागल्याचे; पण १३४ अजूनही गायब असल्याचे म्हटले आहे. ही एक गंभीर घटना आहे. या अनुषंगाने पुढील मागण्या करण्यात आल्या –

१. गोव्यात महिला आणि मुली गायब होण्यामागे काही षड्यंत्र नाही ना ? या मागे ‘लव्ह जिहाद’चा प्रकार तर नाही ना ? याचीही चौकशी करण्यासाठी गृहखात्याने स्वतंत्र चौकशी समिती अथवा पथक नेमावे.

२. गोव्यात लवकरात लवकर ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ आणि ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करावा.

३. ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे हाताळण्यासाठी वा त्यांचा शोध घेण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारच्या धर्तीवर पोलिसांची विशेष शाखा स्थापन करावी. अशा प्रकरणांमध्ये ‘लव्ह जिहाद’च्या नावाखाली गुन्हे नोंद करावेत.

४. ‘लव्ह जिहाद’साठी विदेशातून होणारा अर्थपुरवठा, युवतींची तस्करी आणि त्यांचा आतंकवादी कारवायांसाठी होणारा वापर यांचीही शासनाने चौकशी करावी आणि त्यात सापडलेल्या दोषींवर कठोर कारवाई करावी.

५. लव्ह जिहाद प्रकरणांत मदरसे आणि मशिदी यांचा संबंध आढळून आल्यास त्यांवर तात्काळ बंदी घालण्यात यावी.

६. लव्ह जिहादविषयी जनजागृती करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा. हिंदु जनजागृती समिती यासाठी शासनाला सर्वतोपरी साहाय्य करील.

७. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यापूर्वी गोवा सरकार गोव्यात धर्मांतर खपवून घेणार नसल्याचे आणि गोमंतकियांनी धर्मांतर विषयावरून जागरूक रहाण्याचे आवाहन केले आहे. गोवा सरकारने धर्मांतराची कीड समूळ नष्ट करण्यासाठी धर्मांतरविरोधी कायदा करावा.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सत्यविजय नाईक आणि सौ. शुभांगी गावडे यांनी केले.