बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या वेळी विरोधी पक्षांची तोंडे बंद होती !  

पंतप्रधान मोदी यांची विरोधी पक्षांच्या बैठकीवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी देहली – काही दिवसांपूर्वी बंगालमध्ये पंचायत निवडणुकीमध्ये दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणात हिंसाचार करण्यात आला. रक्तपात करण्यात आला; मात्र त्या वेळी देशातील विरोधी पक्षांची तोंडे बंद होती. काँग्रेस आणि माकप यांचे कार्यकर्ते स्वतःला वाचवण्याचे आवाहन करत होते; मात्र या पक्षांचे नेते स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांना मरण्यासाठी सोडून देत होते, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे कला. ते अंदमान निकोबर येथील पोर्ट ब्लेअरच्या वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या ‘टर्मिनल’ भवनाच्या ऑनलाईन उद्घाटनाच्या वेळी बोलत होते. भाजपच्या विरोधातील पक्षांची बैठक बेंगळुरू येथे झाली. त्यावरून मोदी यांनी ही टीका केली.

पंतप्रधान मोदी यांनी विरोधी पक्षांच्या भ्रष्टाचारावरूनही टीका केली. ते म्हणाले की, (काँग्रेसशासित) राजस्थानमध्ये मुलींवर अत्याचार असो कि प्रश्‍नपत्रिका फुटल्याचा विषय असो, विरोधकांना काहीच दिसत नाही. परिवर्तनाच्या नावाखाली लोकांचा विश्‍वासघात करून मद्य घोटाळा केला जातो, तेव्हा त्यांच्या गटातील लोक अशांना पाठीशी घालतात. तमिळनाडूमध्ये भ्रष्टाराची प्रकरणे बाहेर येत आहेत; मात्र या गटाकडून सर्वांना निर्दोष ठरवले जात आहे. या सर्व विरोधी पक्षांतील लोकांच्या षड्यंत्रामध्येच भारताच्या विकासासाठी स्वतःला समर्पित करत रहायचे आहे. विरोधी पक्षांची एकच विचारसरणी आहे, ती म्हणजे ‘आपले परिवार वाचवा आणि परिवारांसाठी भ्रष्टाचार वाढवा.’