‘हिंदु राष्ट्राच्या स्थापने’साठी प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रामनाथी, गोवा येथे १६ ते २२ जून २०२३ या कालावधीत ‘एकादश (अकरावे) अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’चे आयोजन करण्यात आले आहे. यालाच आता ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’, असे नाव देण्यात आले आहे.
‘हिंदु राष्ट्राची स्थापना’, म्हणजे एकप्रकारे आदर्श अशा ‘रामराज्याचीच स्थापना’ होणे संकल्पित आहे. ‘व्यष्टी आणि समष्टी साधना’ म्हणून प्रत्येकाने हे कार्य कसे करायचे ?’, याविषयी संतांचे मार्गदर्शन प्रतिवर्षी सर्वांना लाभत आहे. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठ आणि त्यांच्या संघटना प्रतिवर्षी नेमाने या अधिवेशनात उत्साहाने सहभागी होत आहेत.
अशा या सात्त्विकतेकडे घेऊन जाणार्या आणि रामराज्य घडवणार्या सत्कार्यात सूक्ष्मातील अनिष्ट शक्ती नेहमी अडथळे आणतात; कारण त्यांना ते कार्य आवडत नाही. ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चे आयोजन करणार्या साधकांनी एप्रिल २०२३ मध्ये या सेवेला आरंभ केला. तेव्हा त्यांना या सेवेत विविध अडथळे येत असल्याचे लक्षात आले. या अडथळ्यांमागील आध्यात्मिक कारणांच्या निवारणार्थ सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना नामजपादी आध्यात्मिक उपाय विचारण्यात आले. त्यांनी सांगितलेल्या आध्यात्मिक उपायांमुळे अडथळ्यांवर मात करता आली. याचा वृत्तांत येथे देत आहोत.
हिंदूंनो, हिंदु राष्ट्र स्थापनेतील अडथळे आपल्या साधनाबळाच्या आधारेच दूर होणार आहेत, हे लक्षात घेऊन साधना वाढवा !
‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ हे कार्य ८५ टक्के आध्यात्मिक, १० टक्के मानसिक आणि ५ टक्के शारीरिक स्तरावरील आहे. त्यामुळे या कार्यात स्थुलातून विविध अडचणी येत असल्या, तरी त्यातील बहुतांश अडचणींचे मूळ कारण हे आध्यात्मिक असते. येथे दिलेला लेखही त्याचे प्रातिनिधिक उदाहरण आहे. ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चे आयोजन करतांना आलेल्या स्थुलातील अडचणी नामजपादी आध्यात्मिक उपाय केल्यामुळे सुटल्या. या सेवेतील काही साधक आजारी पडले, ते औषधोपचाराने बरे झाले नाहीत; पण तेही आध्यात्मिक उपायांमुळे बरे होऊन सेवेसाठी येऊ शकले. म्हणजेच सत्कार्यात येणार्या अडचणी सोडवण्यासाठी नामजप केल्यावर ईश्वराने साहाय्य केलेे आणि गुरुकृपा असेल, तर ईश्वराचे साहाय्यही सहजतेने मिळते !
हिंदूंनो, हिंदु राष्ट्राची स्थापना होण्याच्या प्रक्रियेत येणारे ‘आध्यात्मिक स्तरावरील अडथळे दूर व्हावेत’, यासाठी इतरांनी आपल्यासाठी आध्यात्मिक उपाय करण्याऐवजी प्रत्येकाने स्वत:च आध्यात्मिक उपाय केले, तर अशा प्रकारच्या अडचणी अजून लवकर दूर होतील. एवढेच नव्हे, तर आपण प्रत्येक जण स्वतः आध्यात्मिकदृष्ट्या सक्षम झाल्यास अडचणी येणारही नाहीत. तसेच केवळ अडचणी सोडवण्यासाठी नव्हे, तर या सत्कार्यात प्रत्येक क्षणी मिळणार्या ईश्वराच्या आशीर्वादाचा लाभ घेण्यासाठी आतापासूनच स्वतःची साधना वाढवा !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१३.६.२०२३)
|