भारतातील शहरी नक्षलवादाची वाढती व्‍याप्‍ती आणि त्‍यावर उपाय !

१६ ते २२ जून २०२३ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे होत असलेल्‍या ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’च्‍या निमित्ताने…

‘लष्‍कर-ए-हिंद’ काय आहे ?

‘मुंबईमध्‍ये वर्ष २००६ मध्‍ये साखळी बाँबस्‍फोट करण्‍यात आले होते. तेव्‍हा माझ्‍या मनात अशा आतंकवादाशी वैध मार्गाने सामना करण्‍यासाठी काहीतरी करण्‍याची इच्‍छा होती. ‘देशाच्‍या सीमांवर तर आमचे सैन्‍य लढत असते; परंतु देशाच्‍या अंतर्गत होणार्‍या आतंकवादी कारवायांच्‍या विरोधात कोण लढणार ?’, असा प्रश्‍न माझ्‍या मनात आला. तेव्‍हा वर्ष २००६ मध्‍ये ‘लष्‍कर-ए-हिंद’ ही संघटना स्‍थापन केली. ‘लष्‍कर-ए-हिंद’ची स्‍थापना झाल्‍यानंतर सर्वप्रथम आपल्‍या संसद भवनावर आक्रमण करणार्‍या महंमद अफझलच्‍या फाशीची कार्यवाही करण्‍यासाठी सर्वोच्‍च न्‍यायालयात याचिका प्रविष्‍ट केली. साक्षीदार मिळवले आणि त्‍याला फाशी दिली. त्‍यानंतर अशा प्रकारच्‍या कुठल्‍याही आतंकवादी हालचालींविषयी विविध माध्‍यमांतून माहिती गोळा करून ती गुप्‍तहेर संस्‍थांना देणे, त्‍याचे ‘डॉजिअर’ (एखादी व्‍यक्‍ती किंवा संस्‍था यांच्‍याविषयीची सखोल माहिती असलेली धारिका) बनवून देणेे. विशेषतः जिहादी मानसिकतेला देशातून नष्‍ट करण्‍याचे कार्य ‘लष्‍कर-ए-हिंद’ करते.’

– श्री. ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल, संस्‍थापक अध्‍यक्ष, ‘लष्‍कर-ए-हिंद’

श्री. ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल

१. भारताचे विभाजन आणि हिंदु संस्‍कृती नष्‍ट करणे, यांसाठी देशद्रोह्यांची युती 

‘जिहादी मानसिकता आणि इस्‍लामी आतंकवाद यांची समस्‍या भारतासह संपूर्ण जगभरात आहे. त्‍याहूनही धोकादायक आणि भयंकर समस्‍या ही ‘शहरी (अर्बन) नक्षलवादाची आहे. वर्ष १९८२ मध्‍ये भारतामध्‍ये एक अपवित्र संघटना निर्माण झाली. त्‍यात धर्मनिरपेक्षतावादी, साम्‍यवादी (कम्‍युनिस्‍ट), धर्मांध संघटना आदींचा समावेश आहे. भारतामध्‍ये अधिक प्रमाणात राष्‍ट्रविरोधी विचार निर्माण करून भारताचे विभाजन करणे आणि आपली सनातन संस्‍कृती नष्‍ट करणे, हाच या संघटनेचा उद्देश आहे. यासाठी विदेशी शक्‍ती कार्यरत असून त्‍यांच्‍याकडून त्‍यांना अर्थसाहाय्‍यही मिळत आहे.

या लोकांनी प्रसारमाध्‍यमे, शिक्षण संस्‍था, शासकीय संस्‍था, प्रशासन, राजकारण अशा विविध क्षेत्रांतील लोकांचे हळूहळू धर्मांतर करणे चालू केले आहे. कुणी पाटील होता तो पिटर झाला, कुणी नाईक होता तो जॉन झाला आहे. त्‍यामुळे या षड्‍यंत्राविषयी गांभीर्याने विचार करणे आवश्‍यक आहे.

२. सैनिक आणि प्रामाणिक पोलीस अधिकारी यांचे खच्‍चीकरण करण्‍याचा प्रयत्न करणे

जेव्‍हा पोलीस किंवा सैनिक एखाद्या मोठ्या आतंकवाद्याला ठार मारतात, तेव्‍हा या अभद्र युतीतील लोक दूरचित्रवाणी वाहिन्‍यांवर येऊन आपल्‍या सैनिकांचे मनोबल खच्‍चीकरण करण्‍याचा प्रयत्न करतात. तसेच त्‍यांची चकमक खोटी भासवण्‍याचा प्रयत्न करतात. सैनिकांची मानवाधिकाराखाली चौकशी करण्‍याची मागणी करतात. हे लोक भारताचे विभाजन करण्‍यासाठी संकल्‍पबद्ध आहेत; परंतु आम्‍ही त्‍यांचे उद्दिष्‍ट कधीच यशस्‍वी होऊ देणार नाही. कोणत्‍याही राज्‍यामध्‍ये पोलिसांची आतंकवाद्यांशी चकमक झाली की, पोलीस अधिकार्‍यांवर खटला चालवण्‍यासाठी हे लोक सर्वांत पुढे असतात. त्‍यामुळे जिवावर उदार होऊन लढणार्‍या पोलीस अधिकार्‍यांना कारागृहात खितपत पडावे लागते. यावरून या संघटनेतील लोक किती धोकादायक आहेत, हे लक्षात येते.

३. भारतीय संस्‍कृती नष्‍ट  करण्‍यात माध्‍यमांचा सहभाग

शबरीमला प्रकरणासारखे हिंदूंच्‍या श्रद्धांशी संबंधित कोणतेही प्रकरण असो, प्रसारमाध्‍यमांमधील शहरी नक्षलवादाचे अप्रत्‍यक्ष समर्थक असलेले लोक जाणीवपूर्वक या राष्‍ट्रविरोधी लोकांना चर्चेसाठी बोलावतात. अशा लोकांच्‍या माध्‍यमातून जनतेच्‍या मनात संभ्रम निर्माण करण्‍याचा प्रयत्न करतात. शिक्षण संस्‍थांमध्‍ये काही शहरी नक्षली मानसिकता असलेले प्राध्‍यापक समलैंगिकता आणि व्‍यभिचार यांना प्रोत्‍साहन देणार्‍यांची वकिली करतात. एका बाहुल्‍याला दूरचित्रवाणीवर बसवून समलैंगिकतेवर चर्चा करतात. या माध्‍यमातून हे लोक आपली संस्‍कृती, एकता आणि सार्वभौमत्‍व यांना तोडण्‍याचा प्रयत्न करत आहेत.

४. राजकारणामध्‍ये देशद्रोही लोकांची भरती

राजकारणामध्‍ये कशा प्रकारचे लोक आहेत ? हे आपण सर्व जण पहातच आहोत. शाहीन बाग प्रकरणाच्‍या वेळी प्रसारमाध्‍यमांनी उघडपणे एक वर्तमानपत्र प्रकाशित केले होते. ‘आप’च्‍या एका खासदारला ‘पी.एफ्.आय.’च्‍या लोकांनी आर्थिक साहाय्‍य केले होते. त्‍या विरोधात कोणतीही चौकशी झाली नाही, तसेच कुणालाही अटक झाली नाही. हिंदी चित्रपटसृष्‍टीतही धोकादायक डावी (साम्‍यवादी) विचारसरणी घुसली आहे. अबु सालेम या आतंकवाद्याला भारतात आणले, तेव्‍हा त्‍याचे प्रचंड उदात्तीकरण केले.

५. हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांविषयी हिंदु समाज उदासीन 

आपल्‍या (हिंदु) युवतींच्‍या मुखातून ‘डॉन (कुख्‍यात गुंड) किती देखणा आहे’, असे वाक्‍य असलेले चित्रीकरण केले जाते. अशासकीय संस्‍थांना विदेशातून अनुदान मिळते. आमचे दुर्दैव इतके की, ‘लष्‍कर-ए-हिंद’ ही संघटना राष्‍ट्रासाठी काही कार्य करते; पण आमच्‍या समवेत छायाचित्र काढून घ्‍यायलाही कुणी सिद्ध नसते; कारण ते अडचणीत येतील, असे त्‍यांना वाटते. मी एका उद्योगपतींकडे गेलो असता त्‍यांना ‘लष्‍कर-ए-हिंद’साठी आर्थिक साहाय्‍य मागितले. तेव्‍हा ते म्‍हणाले, ‘‘मला मारायचा विचार आहे का तुमचा ? ’’ अशी आपली (हिंदूंची) स्‍थिती आहे. याउलट धर्मांधांच्‍या ‘पी.एफ्.आय.’ला नियमितपणे आर्थिक साहाय्‍य मिळते. हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांविषयी हिंदु समाज एकदम उदासीन आहे; पण आपले आत्‍मबळ आणि साधना असेल, तर आपल्‍याला आर्थिक अनुदानाची आवश्‍यकता नाही.

६. हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना होईपर्यंत हे करा !

शहरी नक्षलवादी समस्‍येवर आपल्‍यालाच उपाययोजना शोधून काढावी लागणार आहे. हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना करणे, हा या सर्व समस्‍यांवर रामबाण उपाय आहेच; परंतु हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना होईपर्यंत आपण स्‍वस्‍थ बसून राहू शकत नाही. त्‍यामुळे या समस्‍येच्‍या विरोधात आपल्‍याला लढावेच लागणार आहे.

अ. आपले युवा अधिवक्‍ता सिद्ध होत आहेत. त्‍यांनी राष्‍ट्र-धर्मावरील प्रकरणे प्रखरतेने मांडली पाहिजेत. आपण राज्‍यघटनेनुसार वागत असल्‍याने आपले सदस्‍यत्‍व कुणीही रहित करू शकत नाही.

आ. जेव्‍हा काही यंत्रणांकडून भारतीय संस्‍कृतीच्‍या विरोधात भाष्‍य केले जाते, तेव्‍हा आपण त्‍यांना वैधपणे निषेधाचे पत्र पाठवू शकतो. यासाठी आपल्‍याला केवळ एक ‘पोस्‍टकार्ड’ लागेल. अशाच प्रकारची पत्रे अन्‍य यंत्रणांनाही पाठवू शकतो. असे केले, तर त्‍याचाही मोठा परिणाम होऊ शकतो.

इ. काही मासांपूर्वी ‘द कश्‍मीर फाइल्‍स’ नावाचा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला. त्‍याला हिंदु समाजाने डोक्‍यावर घेतले. त्‍यामुळे त्‍या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. त्‍याने हिंदु संस्‍कृतीच्‍या विरोधात चित्रपट बनवणार्‍यांना विचार करण्‍यास भाग पाडले. असे चांगले चित्रपट निर्माते आणि दिग्‍दर्शक यांना आपण साहाय्‍य करू शकतो.

ई. एखाद्या वृत्तपत्राने हिंदु धर्म किंवा राष्‍ट्र यांच्‍या विरुद्ध लेख लिहिल्‍यास त्‍याचा त्‍वरित प्रतिवाद करणारा लेख लिहून तो दैनिक ‘सनातन प्रभात’ला पाठवू शकतो, तसेच तो अन्‍य राष्‍ट्रवादी  वर्तमानपत्रांनाही पाठवू शकतो.

उ. देहलीच्‍या मुख्‍यमंत्र्यांनी मुंबईमध्‍ये एक बैठक आयोजित केली होती. त्‍या विरोधात मी ‘लष्‍कर-ए-हिंद’च्‍या नावाने संबंधित पोलीस ठाण्‍यांना पत्र लिहिले. त्‍यात ‘ते ‘रॅली’ (वाहनफेरी) काढणार असल्‍यास मीही त्‍यांना काळे झेंडे दाखवणार’, असे सांगितले. त्‍यानंतर पोलिसांनी त्‍यांना आणि मलाही ‘कलम १४९’ची नोटीस दिली. त्‍यावर पोलिसांनी मला ‘त्‍यांना अशा प्रकारे रॅली काढू देणार नाही’, असे सांगितले.

७. हिंदु मतदारांची उदासीनता !

आपला हिंदु समाज फार उदासीन आहे. तो निवडणुकीच्‍या दिवशी बाहेर सहलीला जातो ! त्‍यामुळे आपल्‍या लोकांची मतदानाची टक्‍केवारी अत्‍यल्‍प होते. ही आपली सर्वांत मोठी दुर्बलता आहे. त्‍यामुळे आपण मतदानाच्‍या दिवशी घरात बसून रहायचे नाही. एखादा उमेदवार राष्‍ट्रभक्‍त आणि भारतीय संस्‍कृतीचे रक्षण करणारा आहे, असे वाटल्‍यास लोकांनी त्‍याला मतदान करावे; म्‍हणून आपण लोकांना बाहेर काढण्‍याचे काम केले पाहिजे. आपण कोणत्‍याही पक्षाचे नसलो, तरी या राष्‍ट्राचे नागरिक निश्‍चितच आहोत. त्‍यामुळे आपले रक्षण आपल्‍यालाच करावे लागणार आहे.

८. राष्‍ट्रभक्‍तांनी साधना करण्‍याचे महत्त्व

गुरुदेवांनी (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) सांगितल्‍याप्रमाणे हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना होणारच आहे. त्‍यामुळे सर्वांनी कार्य करतांना साधनाही करणे आवश्‍यक आहे. आपल्‍या आध्‍यात्मिक शक्‍तीच्‍या बळावर आपण पुष्‍कळ परिवर्तन घडवून आणू शकतो. त्‍यासाठी आपल्‍याला साधनेचा स्‍तर वाढवणे आवश्‍यक आहे. मागे मला एक युवक भेटला होता. त्‍याच्‍यावर बरेच खटले प्रविष्‍ट करण्‍यात आले होते. त्‍यामुळे त्‍याचे कुटुंब त्‍याला धर्मकार्य करण्‍यास विरोध करत होते. त्‍यामुळे तो पुष्‍कळ निराश झाला होता. मला प्रत्‍येक युवकाला सांगायचे आहे की, कितीही संकटे आली, तरी तुम्‍ही साधना (नामजप) करत रहा. सर्व संकटे आपोआप दूर होतील. आपल्‍या साधनेमुळे खोटे खटले प्रविष्‍ट करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांनाही देव शिक्षा करील, हा माझा स्‍वतःचा अनुभव आहे. त्‍यामुळे कुणीही निराश होण्‍याची आवश्‍यकता नाही. आपण हे कार्य करायचे बंद केले, तर आपणच संपून जाऊ.’

– श्री. ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल, संस्‍थापक अध्‍यक्ष, ‘लष्‍कर-ए-हिंद’

संपादकीय भूमिका

हिंदु समाजाने समस्‍त हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांच्‍या पाठीशी भक्‍कमपणे उभे रहाणे, हे त्‍यांचे धर्मकर्तव्‍यच होय !