लिंग परिवर्तनाचे उदात्तीकरण करणार्‍या ‘स्टारबक्स’ आस्थापनाच्या विरोधात हिंदूंचा संताप !

नवी देहली – ‘स्टारबक्स’ आस्थापनाच्या नव्या विज्ञापनात लिंग परिवर्तनाच्या विकृतीचे उदात्तीकरण करण्यात आले आहे. यामध्ये एक मुलगा त्याच्या आई-वडिलांच्या इच्छेच्या विरोधात जाऊन लिंग परिवर्तन करून मुलगी बनल्याचे दाखवण्यात आले आहे, तसेच आई-वडिलांनी ते शांतपणे स्वीकारल्याचा संदेश देण्यात आला आहे. (एकीकडे समलैंगिक विवाहांना अधिकृत करण्याचे प्रयत्न केले जात आहेत, तर दुसरीकडे लिंग परिवर्तनासारख्या अनैसर्गिक प्रकारांचा उदोउदो केला जात आहे. याविरोधात आता भारतभरातील हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि धर्मप्रेमी हिंदू यांनी एकत्र येऊन आवाज उठवणे आवश्यक आहे ! – संपादक) या विज्ञापनाच्या विरोधात हिंदूंकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.

विज्ञापनामध्ये एक वयस्कर दांपत्य ‘स्टारबक्स’च्या एका दुकानात (‘स्टोर’मध्ये) बसलेले दाखवण्यात आले आहे. पत्नी तिच्या पतीला म्हणते की, ‘तुम्ही या वेळी रागवायचे नाही !’, जणू ‘जे काही होणार आहे, ते तुम्ही शांतपणे स्वीकारायचे आहे’, असे पत्नीला सुचवायचे आहे. थोड्या वेळात त्यांचा ‘अर्पित’ नावाचा मुलगा लिंग परिवर्तन करून एका मुलीच्या वेशामध्ये येतो. तेव्हा आई-वडिलांना अर्पितने लिंग परिवर्तन केल्याचे प्रथमच समजते. वडील सर्वांसाठी ‘कॉफी’ मागवतात. थोड्या वेळाने ‘स्टारबक्स’चा कर्मचारी कॉफी सिद्ध असल्याचे सांगत असतांना अर्पितला ‘अर्पिता’ म्हणून हाक मारतो. हे ऐकून एक प्रकारे वडिलांनी त्यांच्या मुलाच्या लिंग परिवर्तनाला स्वीकृती दिली असल्याचे दर्शवण्यात आले आहे. वडील म्हणतात, ‘‘तू अजूनही माझे मूलच तर आहेस. तुझ्या नावात केवळ एक अक्षरच तर जोडले गेले आहे !’’ तेव्हा सर्व जण भावूक झाल्याचे दाखवण्यात आले आहे.

या आस्थापनाच्या विरोधात हिंदू सामाजिक माध्यमांतून विरोध दर्शवत आहेत. आस्थापनाच्या विरोधात ट्विटरवर ‘#BoycottStarbucks’ नावाचा ‘हॅशटॅग ट्रेंड’ होत आहे. ‘स्टारबक्स ‘अर्पित-अर्पिता’ऐवजी ‘सलीम-सलमा’ या नावाने असे विज्ञापन करण्याचे धाडस करील का ?’ असा प्रश्‍नही एका हिंदूने उपस्थित केला आहे.

संपादकीय भूमिका

  • ‘लिव्ह इन रिलेशनशिप’सारख्या स्वैराचाराच्या माध्यमातून भारतातील युवा पिढीला भ्रष्ट करण्याच्या प्रयत्नानंतर आता ‘लिंग परिवर्तन’ या विकृतीचा उदोउदो करण्याचेच हे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र आहे, हे जाणा !
  • अमेरिकी आस्थापन असलेल्या ‘स्टारबक्स’चा भारतातील व्यवसाय हा ‘टाटा’ उद्योगसमुहाच्या भागीदारीत चालू आहे. त्यामुळे आता ‘टाटा’ने त्यांना खडसावून विज्ञापन मागे घेण्यास भाग पाडले पाहिजे !