दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वृत्ताचा परिणाम !
श्री. हर्षद पालये, रत्नागिरी
रत्नागिरी, १३ एप्रिल (वार्ता.) – दैनिक ‘सनातन प्रभात’च्या १ एप्रिलच्या अंकामध्ये ‘रत्नागिरी बसस्थानकाच्या प्रवेशद्वारातच सोडले जाते मुतारीचे सांडपाणी’ हे वृत्त छायाचित्रासह प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्तामध्ये रत्नागिरी तालुक्याच्या रहाटघर येथील मुख्य बसस्थानकाची दुरवस्था देण्यात आली होती. या वृत्तानंतर एस्.टी. प्रशासनाने बसस्थानकावरील खड्डे बुजवले असून बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावरील मुतारीतील सांडपाणी गटारात सोडण्याची व्यवस्था केली आहे.
या वृत्तामध्ये रहाटघर बसस्थानकाच्या प्रवेशाद्वारावर साचलेले मुतारीचे सांडपाणी, त्यामध्ये साचलेला प्लास्टिकच्या बाटल्यांचा खच, बसस्थानकावर पडलेले मोठमोठे खड्डे, बसस्थानकामध्ये टाकलेली खाद्यपदार्थाची वेष्टने, पिण्याच्या पाण्याचे तुटलेले नळ, प्रसाधनगृहाची दुरवस्था ही सर्व दु:स्थिती छायाचित्रासह प्रसिद्ध केली होती. यानंतर एस्.टी. प्रशासनाने वरील कार्यवाही केली. प्रवेशद्वारावर साचलेला प्लास्टिकच्या बाटल्या उचलून प्रसाधनगृहाची स्वच्छताही केली आहे.
अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एस्.टी. महामंडळाने ‘बसस्थानक स्वच्छता मोहीम’ घोषित केली आहे. मोहीम घोषित करून ४ मास उलटल्यानंतरही प्रत्यक्षात राज्यातील बसस्थानकांची स्वच्छता करण्यात येत नसल्याने दैनिक ‘सनातन प्रभात’मधून एस्.टी. महामंडळाच्या बसस्थानक स्वच्छता मोहिमेचे खरे स्वरूप उघड करणारी वृत्तमालिका प्रकाशित करण्यात येत आहे.
सविस्तर वृत्त वाचा –
♦ #Exclusive : रत्नागिरी बसस्थानकाच्या प्रवेशद्वारातच सोडले जाते मुतारीचे सांडपाणी !
https://sanatanprabhat.org/marathi/668664.html
संपादकीय भूमिकायापुढेही प्रतिदिन बसस्थानकाची स्वच्छता राहील, अशी व्यवस्था प्रशासनाने करायला हवी आणि ज्या प्रवाशांकडून अस्वच्छता होते, त्यांना दंड ठोठावयाला हवा. असे केल्यास येथील स्वच्छता टिकून राहील ! |