‘जय श्रीराम’ म्हटल्याने मिशनरी शाळेतील १० च्या वर्गातील सर्व विद्यार्थी निलंबित !

झारखंडमधील घटना

धनबाद (झारखंड) – बोकारो जिल्ह्यातील गोमिया येथील लॉयोला मिशनरी शाळेच्या मुख्याध्यापकांनी इयत्ता १० वीच्या सर्व विद्यार्थ्यांना ‘जय श्रीराम’चा जयघोष केल्याच्या प्रकरणी २ दिवसांसाठी निलंबित केले. विश्‍व हिंदु परिषदेने या प्रकरणाचे अन्वेषण करून कारवाई करण्याची मागणी शिक्षण विभागाकडे केली आहे. मिशनरी शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले की, विद्यार्थ्यांवर बेशीस्तपणा आणि शिक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करणे या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

१.  विश्‍व हिंदू परिषदेचे धनबाद विभागाचे प्रमुख विनय कुमार यांनी शाळा व्यवस्थापनाच्या विरोधात जिल्हा शिक्षणाधिकार्‍यांना पत्र लिहिले आहे. या प्रकरणी अन्वेषण करून कारवाई करण्याची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.

२. यापूर्वी झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतही असेच प्रकरण समोर आले होते. या घटनेत वर्गातील फलकावर ‘जय श्रीराम’ लिहिल्याविषयी विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आली होती. (मिशनरी शाळांमध्ये ‘ओ गॉड’सारख्या प्रार्थना हिंदु विद्यार्थ्यांनाही म्हणण्यास भाग पाडले जाते; मात्र ‘जय श्रीराम’ म्हटल्यावर मुलांना शिक्षा केली जाते ! असे करायला झारखंड भारतात आहे  कि युरोपमध्ये ? – संपादक)

संपादकीय भूमिका

  • मिशनरी शाळांमधील हिंदुद्वेष नवीन नाही. आता हिंदु पालकांनीच ‘स्वतःच्या पाल्यांना अशा शाळांमध्ये पाठवायचे का ?’, याचा विचार करणे आवश्यक !
  • झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचे हिंदुद्वेषी सरकारने असल्याने अशा ख्रिस्ती शाळांवर कारवाई होणे अशक्य ! हिंदूंनीच न्याय मिळण्यासाठी प्रभावी संघटन उभारणे आवश्यक !