छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील १२ गडदुर्ग किल्ले हे ‘सैनिकी स्थापत्य’ आणि ‘गनिमी कावा युद्धनीती’ या संकल्पनांचा जागतिक वारसा म्हणून प्राथमिक अवस्थेत (वारसा स्थळांची तात्पुरती सूची जी अजून अंतिम झालेली नाही) वर्ष २०२१ मध्ये ‘युनेस्को’ने स्वीकारल्याची वृत्ते अलीकडेच प्रसिद्ध झाली आहेत.
१. व्हिएतनाम देशाचे राष्ट्रपती हो चि मिन्ह यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा धडा आम्ही गिरवला; म्हणूनच आम्ही मोठ्या अमेरिकेला नमवू शकलो. हा महापुरुष आमच्या देशात जन्माला आला असता, तर आम्ही जगावर राज्य केले असते’, असे गौरवोद्गार काढले होते.
२. लंडन आणि न्यूयॉर्क येथील ‘वॉर म्युझियम’मध्ये (युद्धाविषयीचे संग्रहालय) छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाशी दिलेल्या झुंजीला सर्वोत्तम स्थान देऊन त्याचा अभ्यास केला जातो.
जागतिक कीर्ती मिळूनही छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात मात्र त्यांच्या गडदुर्गांची झालेली दुरवस्था पाहून शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमी यांच्या माना लज्जेने खाली जात असल्यास नवल ते काय ?शासकीय आणि राजकीय अनास्था पहाता शिवप्रेमी अन् दुर्गप्रेमी यांना आवाहन आहे की, आता आपणच छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपण्यासाठी सिद्ध होऊया !