बिजनौर (उत्तरप्रदेश) येथे शीख तरुणावर ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास दबाव

  • पगडी काढून केस कापले !

  • ४ जणांना अटक

बिजनौर (उत्तरप्रदेश) – येथील चंपतपूर चकला गावामध्ये शीख तरुणाने ख्रिस्ती धर्म न स्वीकारल्यामुळे त्याची पगडी काढून त्याचे केस कापण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी ४ जणांना अटक केली. हे चौघेही पूर्वी शीख होते आणि त्यांनी नंतर ख्रिस्ती धर्म स्वीकारल्याचे सांगितले जात आहे. (बाटगे अधिक कडवे असतात, त्याचे हे आणखी एक उदाहरण ! – संपादक) शिखांवरील अत्याचाराची माहिती मिळाल्यावर शीख आणि हिंदु नेते यांनी पोलीस ठाण्यात जाऊन निषेध व्यक्त केला.

या गावात रहणारे शीख समुदायाचे महेंद्र सिंह यांनी गावातीलच बलवीर सिंह, मंगल सिंह, छिंदर सिंह आणि अमर सिंह यांच्यावर आरोप करतांना म्हटले की, या ४ आरोपींनी माझा मुलगा गुरप्रीत (वय १८ वर्षे) याला बलपूर्वक ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणला. मुलाने ख्रिस्ती धर्म स्वीकारला नाही, तेव्हा आरोपींनी त्याला अमानुष मारहाण केली. यानंतर आरोपीने त्याची पगडी काढून त्याचे केस कापले. या प्रकरणाच्या निषेधार्थ हिंदु जागरण मंचच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन विरोध केला.

संपादकीय भूमिका

‘केंद्र सरकार धर्मांतरविरोधी कायदा कधी करणार ?’, असा प्रश्‍न अशा प्रत्येक धर्मांतराच्या घटनेच्या वेळी हिंदूंच्या मनात निर्माण होतो. याकडे सरकारने लक्ष द्यायला हवे !