केरळचे मुख्यमंत्री विजयन् यांच्या त्यागपत्राची मागणी करत काँग्रेसकडून विमानात घोषणाबाजी !

थिरूवनंथापूरम् (केरळ) – युवक काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांच्या विरोधात विमानप्रवासात घोषणाबाजी करत त्यांच्या त्यागपत्राची मागणी केली. विजयन् कन्नूरहून थिरूवनंथापुरमला जात होते.

माकपचे ज्येष्ठ नेते ई.पी. जयराजन् यांनी या वेळी निदर्शक कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली. केरळमधील सोन्याच्या तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपी स्वप्ना सुरेश यांनी मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबावर आरोप केल्यापासून विजयन् यांना काँग्रेस अन् भाजप कार्यकर्त्यांकडून विरोध केला जात आहे.