संभाजीनगर येथे महिला आयोगासमोर मांडल्या सर्वाधिक कौटुंबिक छळाच्या तक्रारी !

संभाजीनगर – सासरच्या जाचामुळे त्रस्त असलेल्या अनेक विवाहितांनी त्यांच्या तक्रारी २६ एप्रिल या दिवशी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रूपाली चाकणकर यांच्यासमोर केल्या. या महिलांच्या व्यथा ऐकून चाकणकरांसह अधिकारीही सुन्न झाले होते. ‘राज्यातील अनेक भागांत स्वतः दौरे केले; मात्र कौटुंबिक छळाच्या सर्वाधिक तक्रारी संभाजीनगर येथे दिसून आल्या आहेत’, असे चाकणकर यांनी सांगितले. या प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘महिला आयोग तुमच्या दारी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ५८ महिलांच्या तक्रारी मांडण्यात आल्या. ३ ‘पॅनल’च्या माध्यमातून स्वत: चाकणकर आणि इतर यांनी या तक्रारींचा निपटारा केला.

विलंबाने न्याय म्हणजे अन्याय ! – रूपाली चाकणकर

‘महिलांना त्रास देणारे नोटिसा बजावूनही समोर येत नसतील, तर त्यांच्यावर तात्काळ गुन्हे नोंदवा, असे आदेश सौ. रूपाली चाकणकर यांनी अधिकाऱ्यांना दिले. महिलांची दुर्बलता लक्षात घेऊन अत्याचार होतात. त्यामुळे त्यांना सक्षम केले पाहिजे. समुपदेशन पटापट घ्या, कारण विलंबाने मिळणारा न्याय हा अन्यायच असतो.

बालविवाह न रोखल्यास पद काढा !

जिल्ह्यात बालविवाहाची २ वर्षांत १०२ प्रकरणे समोर आली आहेत. हे विवाह रोखण्यात यश आले आहे; मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात बालविवाह करण्याचे घाट घातला गेला, हे चिंताजनक आहे. गावातील अनेकांना याविषयी माहिती असते. विशेषत: सरपंचांना मुलीचे वय माहिती असते; पण ते असे प्रकार उजेडात आणत नाहीत. यासाठी अशा प्रकरणांत सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर दोष सिद्ध झाला, तर पद काढून घेतले जावे, अशी शिफारस महिला आयोगाने केली आहे.

संपादकीय भूमिका 

  • महिलांवर होणारे कौटुंबिक अत्याचार रोखण्यासाठी सरकार काय उपाययोजना करणार ?
  • विज्ञानाच्या आधारे कितीही समुपदेशन केले, तरी पती आणि पत्नी यांच्यातील वाद संपुष्टात येत नाहीत. पती आणि पत्नी यांनी धर्माचरण आणि साधना केल्यासच त्यांच्यातील वाद दूर होऊ शकतात.