नागरिकांची दुःस्थिती
रशिया-युक्रेन युद्धात नागरिकांसाठी बंकरची व्यवस्था नसल्याने भुयारी रेल्वे मार्गांमध्ये, तसेच भूमीगत वाहनतळ, भूमीगत खोल्या, दुकानांची तळघरे यांमध्ये नागरिकांची व्यवस्था करावी लागली. युद्धाच्या आरंभी मृत्यूच्या भयाने लाखो नागरिकांनी युक्रेनमधून घरातील जमतील तेवढ्या वस्तू, साहित्य घेऊन पलायन करून आसपासच्या देशांमध्ये आश्रय घेतला. अनेकांना कडाक्याच्या थंडीशी सामना करत रेल्वेस्थानके, रस्त्यावरील मोक्याची ठिकाणे येथे थांबावे लागले. अनेक नागरिक आक्रमणांमध्ये मृत्यूमुखी पडले, तर काही घायाळ झाले.
जीवनावश्यक वस्तू मिळवण्यासाठी नागरिकांची हाणामारी
सरकारकडून देण्यात येणाऱ्या पाव किंवा धान्य यांसारख्या खाण्याच्या वस्तू मिळवण्यासाठी नागरिक हाणामारी करत असल्याचे दृष्य युक्रेनमध्ये दिसले. एरव्ही पाश्चात्त्य शिस्तबद्ध असतात म्हणून आपण त्यांचे कौतुक करतो; मात्र आपत्काळ आल्यावर त्यांचाही संयम ढळतो, हे अशा घटनांतून दिसते. रशियात मॅकडोनाल्डच्या दुकानांबाहेर नागरिकांची प्रचंड गर्दी पहाण्यास मिळाली. या ठिकाणी एक बर्गर २६ सहस्र रुपयांमध्ये विकला जात होता. त्याचे एरव्हीचे मूल्य ७० ते १३० रुपये एवढे आहे. रशियावर युरोपिय संघ आणि अमेरिका यांनी कडक निर्बंध लादल्याने महागाई प्रचंड वाढली.
सर्वांकडे साहाय्यासाठी याचना करावी लागणे
युक्रेनला युरोपियन महासंघ, भारत, अन्य देश यांच्याकडे वारंवार साहाय्य आणि मध्यस्थी यांसाठी हात पसरावे लागत आहेत. रशियाने युक्रेनच्या सैन्यतळांवर आक्रमण करण्याच्या समवेत तेथील तेलाचे साठे, प्रशासकीय इमारती, सैन्याची रुग्णालये, अणू प्रकल्पातील कचरा यांच्यावर आक्रमणे केल्यामुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. अणू प्रकल्पाशी संबंधित गोष्टींवर आक्रमणे झाल्यामुळे किरणोत्सर्गही चालू झाल्याची वृत्ते आली. अशा वेळी युक्रेन मात्र अजूनही अमेरिका, युरोपीय देश यांच्याकडे रशियावर कडक निर्बंध घालण्याची, तसेच रशियाला युद्ध गुन्हेगार ठरवण्याची केविलवाणी मागणी करत होता.
सायबर आक्रमणांमुळे अनेक यंत्रणा ठप्प !
प्रत्यक्ष युद्धासमवेत युक्रेनमधील संगणकीय यंत्रणांवर सायबर आक्रमणे झाली. यामुळे दैनंदिन व्यवहार करण्यासाठी तेथे स्थानिक आस्थापने आणि विदेशी आस्थापने यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. अनेकांनी आस्थापने बंद केली. संगणकीय यंत्रणांवर आक्रमण झाल्यास ऑनलाईन पैशांचे व्यवहार करणेही अडचणीचे होणार आहे, हे भारतियांनी लक्षात घ्यावे.
– श्री. यज्ञेश सावंत, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.३.२०२२)