सिंधुदुर्ग विमानतळावर आलेल्या ९६ प्रवाशांपैकी एक प्रवासी कोरोनाबाधित

(प्रतिकात्मक चित्र)

सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावर ८ ते १३ डिसेंबर या कालावधीत आलेल्या ९६ परदेशी प्रवाशांपैकी एक प्रवासी कोरोनाबाधित असल्याचे आढळल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग विमानतळावर परदेशी पर्यटक येऊ लागले असून ८ ते १३ डिसेंबर या कालावधीत येथे एकूण ९६ विदेशी प्रवासी उतरले. त्यांपैकी ७ दिवस पूर्ण झालेल्या २५ प्रवाशांची आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी करण्यात आली. त्यांपैकी सावंतवाडी तालुक्यात एक व्यक्ती कोरोनाबाधित आढळला. त्याच्या संपर्कातील ७ जणांचा अहवाल पुणे येथे पाठवण्यात आला आहे.

नव्याने संसर्ग होत असलेल्या ‘ओमिक्रॉन’ या कोरोनाच्या प्रकाराच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. जिल्ह्यात येणार्‍या विदेशी पर्यटकांची तपासणी करण्यात येत आहे.