पाट ते पिंगुळी रस्त्याच्या कामाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष : ग्रामस्थांनी पालकमंत्री उदय सांमत यांच्या वाहनांचा ताफा अडवला

रस्त्याच्या कामाविषयी अधिकार्‍यांशी भ्रमणभाषवर बोलताना पालकमंत्री उदय सामंत (हातात फोन असलेले)

कुडाळ – तालुक्यातील पाट ते पिंगुळी रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनचालक आणि प्रवासी यांचे हाल होत आहेत. याविषयी गेली २-३ वर्षे विविध माध्यमांतून शासनाकडे पाठपुरावा करूनही रस्त्याचे काम न केल्याने अखेर संतप्त ग्रामस्थांनी १० डिसेंबरला या मार्गावरून जाणारे पालकमंत्री उदय सामंत यांच्या वाहनांचा ताफा आंदुर्ले खिंड येथे अडवला आणि रस्त्याची दु:स्थिती निदर्शनास आणून दिली. यावेळी पालकमंत्री सामंत यांनी संबंधित ठेकेदार आणि बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्याशी संपर्क केला अन् ‘येत्या १० दिवसांत रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ केला जाईल’, असे आश्‍वासन ग्रामस्थांना दिले; मात्र ग्रामस्थांनी ‘१ मासात काम पूर्ण न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल’, अशी चेतावणी पालकमंत्री सामंत यांना दिली.

या वेळी ग्रामस्थांनी सांगितले की, सिंधुदुर्ग विमानतळाच्या उद्घाटनापूर्वी रस्त्याचे काम केले नाही, तर आंदोलन करण्याची चेतावणी दिली होती. त्या वेळी रस्त्याच्या कामासाठीची यंत्रसामुग्री आणून रस्त्याचे काम चालू करण्यात आले; मात्र विमानतळाचे उद्घाटन झाल्यावर लगेच २ दिवसांनी काम थांबवून ठेकेदार निघून गेला. याविषयी चौकशी केल्यावर ‘अद्याप कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) मिळाला नाही’, असे सांगण्यात आले. याचा अर्थ लोकांची दिशाभूल करून विमानतळाचे उद्घाटन करून घेतले. त्यामुळे ग्रामस्थांच्या मनात संतप्त भावना होत्या.

१० डिसेंबरला सिंधुदुर्ग विमानतळावरून पालकमंत्री सामंत ओरोस येथे याच मार्गाने जाणार असल्याचे समजल्यावर आंदुर्ले खिंड येथे ग्रामस्थांनी एकत्र येत पालकमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा थांबवला. या वेळी कुडाळ पंचायत समितीचे माजी सभापती संजय वेंगुर्लेकर, तेंडोली सरपंच मंगेश प्रभु, म्हापणचे माजी सरपंच नाथा मडवळ, आंदुर्लेचे माजी सरपंच सौ. आरती पाटील, उपसरपंच ज्ञानेश्‍वर तांडेल, पाटच्या माजी सरपंच सौ. कीर्ती ठाकूर, माड्याचीवाडीचे माजी सरपंच दाजी गोलम यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.