रशियाने पाठवले रणगाडे !
नवी देहली – तालिबानचे राज्य असणार्या अफगाणिस्तानमध्ये आता जिहादी आतंकवाद्यांना मोकळे रान मिळाले आहे. अफगाणिस्तान आणि मध्य आशियाई देशांच्या सीमेवर इस्लामिक स्टेटचे आतंकवादी आहेत. इस्लामिक स्टेटचे १० सहस्र आतंकवादी रशियामध्ये घुसण्यासाठी प्रयत्नरत असल्याची माहिती रशियाने दिली आहे. या आतंकवाद्यांचा ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान देशांमध्ये घुसखोरी करण्याचा डाव आहे, असे सांगण्यात येत आहे. यामुळे रशियाने ताजिकिस्तानला ३० अत्याधुनिक रणगाडे पाठवल्याचे सांगण्यात येत आहे.
इस्लामिक स्टेट रशियाला त्याचा सर्वांत मोठा शत्रू समजतो. इस्लामिक स्टेटचा नायनाट करण्यासाठी रशियाने सीरियामध्ये अनेक हवाई आक्रमणे केली होती. आता ताजिकिस्तानाच्या सीमेवर इस्लामिक स्टेटचे १० सहस्र आतंकवादी गोळा झालेले आहेत. रशियाने केलेल्या हवाई आक्रमणांचा सूड उगवण्यासाठी हे आतंकवादी अफगाणिस्तानची सीमा पार करून ताजिकिस्तान अन् तेथून कझाकस्तानमार्गे रशियामध्येही घुसू शकतात, अशी पुतिन यांना चिंता आहे.