काबुलमधील परिस्थिती आता अधिक सुरक्षित असून ती माजी राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांच्या काळातही नव्हती !

रशियाकडून तालिबानचे कौतुक

पाक, चीन यांच्यानंतर आता रशियाने तालिबानचे अशा प्रकारे समर्थन करण्याचा केलेला प्रयत्न भारतासाठी मोठा धक्काच आहे. रशियाने अमेरिकेला चपराक लगावण्यासाठी असे म्हटले, तरी भविष्यात रशियाची भूमिका काय असणार, हा प्रश्न भारतासमोर असणार ! – संपादक 

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन

मॉस्को (रशिया) – काबुलमधील परिस्थिती आता अधिक सुरक्षित दिसत आहे. इतकी की, जेवढी माजी राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांच्या काळातही नव्हती. काबुलमध्ये आता शांततापूर्ण वातावरण आहे, अशा शब्दांत रशियाने तालिबानचे कौतुक केले आहे. रशियाचे अफगाणिस्तानमधील दूत दिमित्री झिरनोव्ह यांनी हे विधान केले आहे. विशेष म्हणजे अजूनही रशियामध्ये ‘तालिबान’ ही सरकारी नोंदीनुसार एक आतंकवादी संघटना आहे. असे असले, तरी पाकिस्तान आणि चीन यांच्यानंतर तालिबानी राजवटीसाठी अनुकूल ठरणारा रशिया हा तिसरा देश ठरू पहात आहे.

झिरनोव्ह यांनी म्हटले की, अमेरिकी सैन्याकडून त्याच्या नागरिकांना अफगाणिस्तानमधून काढण्याचा प्रयत्न करत असतांनाही ज्या वेगाने तालिबानने संपूर्ण देशावर नियंत्रण मिळवले, ते पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो. इतरही अनेक देशांना याचे आश्चर्य वाटले असणार ! आधीची सत्ता अगदी पत्त्यांप्रमाणे कोसळून पडली. अफगाणिस्तानमध्ये एक प्रकारची गोंधळाची भावना होती. या परिस्थितीत समाजकंटक रस्त्यांवर फिरत होते. प्रारंभी नि:शस्त्र तालिबानी गट काबुलमध्ये दाखल झाला. त्यांनी सरकार आणि अमेरिकी सैन्य यांना शस्त्र खाली ठेवायला सांगितले. राष्ट्राध्यक्ष घनी यांनी पलायन केल्यानंतर शस्त्रधारी तालिबानी काबुलमध्ये आले आहेत.