१. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ चित्रीकरणकक्षात आल्यानंतर ‘तेथील वातावरण पालटले आहे आणि कक्षाची उंची वाढली आहे’, असे जाणवणे
‘२३.७.२०२१ या दिवशी गुरुपौर्णिमेचा ‘ऑनलाईन’ सोहळा होता. त्याची पूर्वसिद्धता बघण्यासाठी जेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ चित्रीकरणकक्षात आल्या, तेव्हा ‘तेथील वातावरण पूर्ण पालटले आहे. चित्रीकरणकक्षाची उंची पुष्कळ वाढली आहे’, असे मला जाणवले.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी श्री महागणपतीचे ध्यान केल्यावर ‘साक्षात् सिद्धिविनायक येऊन सर्व उपचार ग्रहण करत आहे’, असे जाणवणे
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ गणपतिपूजनाचा सराव करत होत्या. तेव्हा त्यांनी श्री गणपतीचा श्लोक म्हणून श्री महागणपतीचे ध्यान केले. त्या वेळी ‘तेथे ऋद्धि-सिद्धि यांच्या समवेत सिद्धिविनायक आला आहे आणि तोच श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ करत असलेले सर्व उपचार (फूल अर्पण करणे, नैवेद्य दाखवणे इत्यादी) ग्रहण करत आहे’, असे मला जाणवले.
३. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी गुरुदेवांची महती सांगून साधकांमध्ये भाव निर्माण करणे
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आम्हाला म्हणाल्या, ‘‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून चैतन्याचा मुख्य स्रोत आला आहे आणि त्यांनी आतापासूनच या ठिकाणी गुरुतत्त्वाचे बीज रोवायला आरंभ केला आहे.’’ हे सूत्र सांगून त्यांनी आम्हा सर्वांच्या मनात भाव निर्माण केला, तसेच आमच्यात सहजता निर्माण केली. त्या वेळी ‘ही गुरुपौर्णिमा पुष्कळ छान होणार’, असे महर्षींनी सांगितले आहे’, असे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगितले.
४. पूजास्थळी नामजप करतांना ‘वातावरणात पुष्कळ प्रमाणात गुरुतत्त्व आहे’, असे जाणवणे, ‘श्री सद्गुरुभ्यो नमः।’ हा पूजेतील मंत्र आपोआपच म्हटला जाणे आणि मनातील विचार न्यून होऊन मन निर्विचार होणे
मी पूजास्थळी नामजपाला बसलो होतो. त्या वेळी ‘आज वातावरणात पुष्कळ प्रमाणात गुरुतत्त्व आहे. त्यामुळे सर्व मंत्र आणि नामजप यांतील सर्व शक्तीसुद्धा गुरुनामातच येऊन स्थिरावली आहे’, असे मला वाटले. त्यामुळे माझ्याकडून ‘श्री सद्गुरुभ्यो नमः।’(म्हणजे सद्गुरूंना माझा नमस्कार असो.), हा पूजेतीलच मंत्र आपोआपच म्हटला जात होता. हा मंत्रजप करत असतांना माझ्या मनातील अन्य विचार न्यून होऊन माझे मन स्थिर होऊ लागले.
५. पूजनापूर्वी ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यामधून एक ज्योत बाहेर येऊन ती स्वतःत स्थिरावली आहे आणि ती ज्योतच पूजन करवून घेणार आहे’, असे साधकाला जाणवणे अन् त्याप्रमाणे ‘पूजेच्या वेळी एक शक्ती स्वतःकडून सर्व करवून घेत आहे’, अशी अनुभूती त्याला येणे
पूजनाचा आरंभ होण्यापूर्वी सूत्रसंचालन चालू होते. तेव्हा ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यामधून एक ज्योत बाहेर आली आणि ती माझ्यात स्थिरावली आहे’, असे मला जाणवले अन् ‘पुढील सर्व पूजन मी करत नसून ती चैतन्यमय ज्योतच माझ्याकडून ते करवून घेणार आहे’, असे मला वाटले. त्याप्रमाणे खरोखरच ‘पूजेच्या वेळी मी कोणाशीतरी जोडला गेलो आहे आणि ती शक्तीच माझ्याकडून सर्व करवून घेत आहे’, असे मला जाणवत होते.
६. पूजेच्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची भावजागृती झाल्याचे पाहून साधकाने अनुभवलेली भावावस्था !
पूजेसाठी महर्षींच्या मार्गदर्शनानुसार बनवलेल्या वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमेला वाकून नमस्कार करतांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची भावजागृती होत होती. त्या वेळी ‘आदल्या रात्रीपासून वातावरणातील गुरुतत्त्वाची स्पंदने अधिकच वाढली आहेत’, असे मला जाणवले. तेव्हा माझा भाव पुष्कळ जागृत होत होता. त्या वेळी तिथे उपस्थित असलेले सर्वच साधक भावविभोर झाले होते. प्रत्येकालाच ‘आपली सेवा थोडा वेळ थांबवून तो क्षण अनुभवावा’, असे वाटत होते. या अनुभूतीतून देवाने आम्हा सर्वांनाच ‘जेव्हा सद्गुरूंची भावजागृती होते, तेव्हा त्यांच्यातील भावाची अत्युच्च स्थिती कशी असते ?’, हे शिकवले’, असे मला वाटले. या वेळी वातावरणात भाव आणि चैतन्य यांची तीव्रता एवढी होती की, ‘माझे शरीर अन् मन शुद्ध होत आहे. भाव आणि चैतन्य यांत मी न्हाऊन निघत आहे’, असे मला वाटत होते.
७. एकाच वेळी ‘गुरु’ आणि ‘शिष्य’ अशा दोन्ही रूपांत असणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ !
खरेतर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ गुरुस्थानी आहेत. पूजनाच्या वेळी ठेवण्यात आलेल्या प्रतिमेमध्ये सनातनच्या तीनही गुरूंची (परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची) छायाचित्रे होती. त्यांत श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचेही छायाचित्र होते, तरीही साधकांच्या प्रतिनिधी बनून त्या आम्हा सर्वांच्या वतीने पूजन करत होत्या. तेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आम्हाला एकाच वेळी ‘गुरु’ आणि ‘शिष्य’ अशा दोनही रूपांत दर्शन देत होत्या. त्यामुळे पूजा करतांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या मनात जे जे भाव होते, ते ते सर्व भाव आम्हा सर्वांच्या मनात रोवले जात होते’, असे मला जाणवले.
८. कृतज्ञता
‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळताई, ‘आपणच आम्हा सर्वांकडून ही पूजेची सेवा करवून घेतलीत, तसेच या पूजेच्या सिद्धतेमध्ये, सरावाच्या वेळी आणि प्रत्यक्ष पूजन करतांना प्रत्येक कृतीमध्ये परिपूर्णता आणण्यासाठी आपणच मार्गदर्शन केलेत’, यासाठी आम्ही आपल्या चरणी कृतज्ञ आहोत.’ – श्री. मंदार (२४.७.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |