१. भारताला आतंकवादाचा धोका अजूनही कायम असल्याने सतत सतर्क रहाणे आवश्यक !
‘आतंकवाद, माओवाद, ईशान्य भारतातील उग्रवाद आणि बांगलादेशी घुसखोरी हे सर्व आतंकवादाचे प्रकार आहेत. भारताला या सर्व प्रकारच्या आतंकवादाचा सामना करावा लागत आहे. काहींना वाटते की, भारत पाकिस्तानसमवेत क्रिकेट खेळला, तर दोन देशांमध्ये सलोख्याचे संबंध निर्माण होतील आणि पाकिस्तान आतंकवाद थांबवेल. पाकिस्तानसमवेत क्रिकेट खेळून जर आतंकवाद थांबला असता, तर भारतातील सहस्रो पटांगणांमध्ये आपण क्रिकेटचे सामनेच भरवले असते. क्रिकेट खेळल्याने आतंकवाद थांबणार नाही; कारण पाकिस्तानला काश्मीर हवे आहे आणि ते आपण कधीही देऊ शकत नाही. भारतात आतंकवाद पसरवण्यामागे ‘आयएस्आय’ ही पाकिस्तानची गुप्तचर संस्था कारणीभूत आहे. भारतातील सरकारे येतील आणि जातील; पण ‘आयएस्आय’ ही भारताला कायमच रक्तबंबाळ करत रहाणार आहे.
पाकिस्तानी आतंकवादामुळे आतापर्यंत भारतात सहस्रो लोकांचा मृत्यू झाला आहे. वर्ष २०१४ पासून आपण आक्रमक धोरण स्वीकारले. त्यानंतर आतंकवादामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. हे जरी खरे असले, तरी आतंकवादाचा धोका अजूनही कायम आहे. पाकिस्तान काश्मीरमध्ये आतंकवाद पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांचे राज्य येईल, तेव्हा पाकिस्तान सहस्रो आतंकवादी भारतात घुसवण्याचा प्रयत्न करील. त्यामुळे आपल्याला कान आणि डोळे उघडे ठेवून सतर्क रहावे लागणार आहे.
२. काळानुसार आतंकवाद्यांना ‘ऑनलाईन’ प्रशिक्षण देण्यात येणे
अ. वर्ष १९७१ चे युद्ध हरल्यानंतर ‘काश्मीर घेण्यासाठी केवळ पारंपरिक युद्ध उपयोगाचे नाही’, असे पाकिस्तानच्या लक्षात आले. तेव्हापासून त्याने अपारंपरिक युद्ध, म्हणजे भारताच्या विविध भागांमध्ये आतंकवाद पसरवणे चालू केले. वर्ष १९८४ मध्ये काश्मीरमध्ये प्रथम आतंकवादी कारवाया चालू झाल्या. त्या वेळी तेथे ६ ते ७ सहस्र आतंकवादी होते. त्यात ४० टक्के विदेशी आणि ६० टक्के स्थानिक आतंकवाद्यांचा समावेश होता. भारतीय सैन्याला तेथे तैनात करण्यात आल्यानंतर आतंकवाद्यांची संख्या हळूहळू न्यून होत गेली. प्रत्येक वेळी नवीन भरती चालूच राहिली; परंतु भारतीय सैन्याने त्यांचा बीमोड केला. सध्या काश्मीरमध्ये २०० ते २५० आतंकवादी आहेत.
आ. पूर्वी आतंकवाद्यांना मदरसे आणि मशिदी यांमधून प्रशिक्षण मिळायचे. आता ते ‘ऑनलाईन’ पद्धतीने दिले जाते. अलीकडे इसिसच्या सगळ्या आतंकवाद्यांना संकेतस्थळाच्या माध्यमातून प्रशिक्षण मिळाले आहे. भारतात आतंकवाद्यांचे २०० ते २२० छुपे सेल आहेत. महाराष्ट्रातही ते मोठ्या संख्येने आहेत. याविषयी गृहविभागाच्या संकेतस्थळावर माहिती मिळू शकते.
इ. उग्रवादी बनवण्याचे प्रशिक्षण अतिशय कठोर असते. १०० युवकांना उग्रवादी बनवण्याचा प्रयत्न केला, तर त्यातील ५ ते ६ युवकच उग्रवादी होतात आणि त्यातीलही १ – २ युवक आतंकवादाकडे वळतात. महाराष्ट्राततील अनेक युवक बेपत्ता आहेत. ‘त्यातील अनेक जण हे आतंकवादी बनण्यासाठी गेले आहेत’, असेही म्हटले जाते. आतंकवाद्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना ८ ते १० च्या गटाने भारतात घुसवले जाते. नियंत्रण रेषेवर भारतीय सैन्य त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते. त्या संघर्षात ९५ टक्के आतंकवादी ठार होतात; पण ५ टक्के आतंकवादी भारताच्या हद्दीत घुसतात. शेवटी तेच देशात स्फोट घडवतात.
३. पाकिस्तानने खलिस्तानवादाच्या माध्यमातून भारतात आतंकवाद पसरवणे
मी काश्मीरमध्ये माझे अनेक सहकारी गमावले आहेत. ते तेथे लढण्यासाठी गेले होते; पण पुन्हा कधीच परत आले नाहीत. पाकिस्तानने वर्ष १९८० च्या दशकात पंजाबमध्ये खलिस्तानी आतंकवादाला प्रोत्साहन दिले. तो आतंकवाद हाणून पाडण्यासाठी मोठा संघर्ष झाला. त्यात पंजाब पोलीस आणि सैन्य यांचे अनेक सैनिक हुतात्मा झाले. आता पुन्हा खलिस्तानी आतंकवाद पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न चालू आहे. शेतकरी आंदोलनामध्ये खलिस्तानी घुसल्याच्या बातम्या ऐकायला मिळाल्या. या खलिस्तानवाद्यांना अमेरिका, कॅनडा आणि इंग्लंड या देशांमधून साहाय्य मिळते.
४. आतंकवादाच्या प्रकारांविषयीची काही उदाहरणे
काही मासांपूर्वी कोरोना लसीचे उत्पादन करणार्या ‘सीरम इन्स्टिट्यूट’मध्ये आग लागली. त्यात सहस्रो कोटी रुपयांची हानी झाली. तेथे आग लागण्याची कोणतीही शक्यता नव्हती. त्यामुळे तेथे आग लावण्यामागे चीनचा घातपात होता. त्यानंतर काही दिवसांनी उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळून अनेक जण मरण पावले. फेब्रुवारीत कधी हिमकडा कोसळतो का ? काहीही कारण नसतांना तो कोसळला होता. तो कोसळवण्यामागेही नक्कीच घातपात होता. २ वर्षांपूर्वी चीनमधून येणार्या ब्रह्मपुत्रा नदीचा प्रवाह अचानक थांबला होता. वर्ष २०२० मध्ये महाराष्ट्रात ३ – ४ सहस्र कोटी रुपयांचे अफू, गांजा आणि चरस पकडण्यात आले होते. हे सर्व आतंकवादाचेच प्रकार आहेत.
५. देशात आंदोलनाच्या माध्यमातून हिंसाचार माजवून आतंकवाद निर्माण करणे !
शेतकरी कायद्याला विरोध करण्याच्या नावाखाली देहलीकडे येणारे महामार्ग अनेक मास अडवून ठेवण्यात आले. शहराला लागणारी प्रत्येक जीवनावश्यक गोष्ट शहराच्या बाहेरून येत असते. त्यासाठी सहस्रो ट्रक शहरात ये-जा करत असतात. ते आत येऊ न शकल्याने वस्तूंची टंचाई निर्माण होते आणि महागाई वाढते. या आंदोलनामध्ये डाव्या आतंकवाद्यांचा सहभाग होता. तसेच त्यात खलिस्तानीही सहभागी असल्याच्या बातम्या येत होत्या. या लोकांनी देहलीचे २-३ मार्ग बंद केले होते. त्यामुळे देशाची प्रतिदिन ४ ते ५ सहस्र कोटी रुपयांची हानी झाली. महाराष्ट्रात २ वर्षांपूर्वी झालेल्या आंदोलनामध्ये राज्यातील ४० टक्के बसगाड्या जाळण्यात आल्या होत्या. त्यामुळे केवळ बॉम्ब आणि शस्त्रे घेऊनच आतंकवाद होतो, असे नाही, तर देशात अनेक प्रकारचा हिंसाचार माजवूनही आतंकवाद निर्माण केला जातो. याला आपण ‘घातपात आतंकवाद’ही म्हणू शकतो.
६. महाराष्ट्र आणि खलिस्तान यांचा संबंध !
अ. महाराष्ट्राचे सुपुत्र जनरल अरुणकुमार वैद्य यांच्याकडे भारतीय सैन्याचे नेतृत्व असतांना सुवर्ण मंदिरामध्ये खलिस्तानी आतंकवादी घुसले होते. तेव्हा भारतीय सैन्याने ४०० ते ५०० आतंकवाद्यांना ठार मारले आणि सुवर्ण मंदिर खुले केले; मात्र त्यासाठी ७० हून अधिक सैनिकांनी प्राणाचे बलीदान दिले. सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर जनरल वैद्य पुण्यामध्ये स्थायिक झाले. एक दिवस खलिस्तानी आतंकवाद्यांनी त्यांच्यावर आक्रमण केले. त्यात जनरल वैद्य यांचा मृत्यू झाला.
आ. अलीकडे कोरोना महामारीमुळे सध्या मोठ्या कार्यक्रमांवर बंदी आहे. नांदेडच्या गुरुद्वारामध्ये एक समारंभ होणार होता. त्याला पोलिसांनी अनुमती नाकारली. तेव्हा तेथील काही तरुणांनी पोलिसांवर आक्रमण केले. यात २५ पोलीस घायाळ घाले. अशा प्रकारे खलिस्तानी आतंकवाद पुन्हा पुनर्जीवित केला जाऊ शकतो. यामागेही पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आयएस्आय’च आहे.
७. कोलकातावरून ईशान्य भागात जाण्यासाठी बांगलादेशातून जावे लागत असल्याने त्याच्याशी चांगले संबंध ठेवावे लागणे
काही वर्षांपूर्वी ईशान्यकडील ‘बोडो’ आतंकवाद्यांना महाराष्ट्रातील पुण्यामध्ये पकडण्यात आले होते. ज्या वेळी आतंकवाद्यांना विश्रांती घ्यायची असते आणि सुरक्षादलापासून दूर रहायचे असते, तेव्हा ते मोठ्या शहरांमध्ये वास्तव्याला जातात; कारण तेथे त्यांना ओळखणे सोपे नसते. ईशान्य भागातील, तसेच अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय या राज्यांमध्ये आतंकवाद नाही. आसाममध्ये ‘उल्फा’ ही आतंकवादी संघटना तेथे पुनर्जीवित होण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच नागालॅण्ड आणि मणिपूर येथे अजूनही आतंकवादाला पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न होत आहे. पूर्वी कोलकातावरून ईशान्य भारतात जाण्यासाठी बांगलादेशच्या (आधीच्या पूर्व पाकिस्तानातून) मार्गाने जावे लागत असे. वर्ष १९७१ मध्ये बांगलादेश स्वतंत्र राष्ट्र झाले. त्यानंतर मिझोराम किंवा त्रिपुरा येथे जाण्यासाठी लागणारे अंतर ७ पटींनी अधिक वाढले. त्यामुळे आपण बांगलादेशाशी चांगला संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत असतो.
८. बांगलादेशी घुसखोरांच्या दृष्टीने महाराष्ट्राला मानाचे स्थान !
बांगलादेशच्या सीमेला लागून असलेल्या भारतीय प्रदेशात ९० टक्के लोकसंख्या ही बांगलादेशी आहे. आता त्यांची संख्या एवढी वाढली आहे की, त्यांनी भारताच्या अन्य भागांतही हात-पाय पसरणे चालू केले आहे. त्यांच्या दृष्टीने महाराष्ट्राला मानाचे स्थान आहे. मुंबई, संभाजीनगर आणि भिवंडी येथे ते मोठ्या प्रमाणात रहातात. त्यांच्यामुळे भारतात अमली पदार्थ आणि बनावट नोटा यांची मोठ्या प्रमाणात तस्करी होते. ते विविध ठिकाणी स्वस्तात कामे करतात. निम्न दर्जाची कामे त्यांनी स्वत:कडे घेतली आहेत. त्यामुळे भारतीय लोकांना कामाची मारामार आहे. त्यांनी कोकणातही मासेमारांच्या बोटींवर जाणे चालू केले आहे. अशा स्थितीत बांगलादेशी घुसखोर ही देशाची मोठी समस्या असून ती लवकर संपणे आवश्यक आहे.
९. २६/११ च्या आक्रमणानंतर महाराष्ट्रात ‘एन्एसजी’चे हब निर्माण करणे
२६/११ च्या आतंकवादी आक्रमणाच्या वेळी १० आतंकवादी मुंबईत आले. भारताच्या ‘एन्एसजी’ कमांडोंनी त्यातील ८ जणांना ठार केले. आता महाराष्ट्र पोलिसांनीही आतंकवादाच्या विरोधात लढण्यासाठी ‘फोर्स १’ नावाचे दल निर्माण केले आहे. यासमवेतच महाराष्ट्रात ‘एन्एसजी’चे हब निर्माण करण्यात आले आहे. सैन्यातून निवृत्त झाल्यावर काही माजी सैनिक हे पोलीस सेवेत भरती होतात. त्यातीलच एक असलेले तुकाराम ओबाळे यांनी २६/११ च्या आक्रमणातील एका आतंकवाद्याला ठार मारले होते.
१०. आतंकवाद्यांना त्वरित शिक्षा मिळण्यासाठी न्यायव्यवस्था जलद बनवणे आवश्यक !
भारतात आतंकवाद्यांच्या विरोधात अनेक वर्षे खटले चालतात, उदा. १९९३ चा बॉम्बस्फोट खटला अजूनही चालू आहे. जोपर्यंत आपली न्यायव्यवस्था जलद होणार नाही, तोपर्यंत आतंकवादी त्यांच्या कारवाया करतच रहाणार आहेत.’
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे
भारतात चालू असलेले आतंकवादाचे विविध प्रकार !१. ‘एस्.एम्.एस्.’ बॉम्ब : दोन वर्षांपूर्वी मुंबई-पुणे येथे रहाणार्या ईशान्य भागातील लोकांना एस्.एम्.एस्. (संदेश) पाठवण्यात आले होते. त्यात त्यांच्यावर आक्रमण करण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. हा ‘एस्.एम्.एस्. बॉम्ब’ होता. ज्यांनी या धमक्या दिल्या होत्या, त्यांना पकडण्यात आलेले नाही. आझाद मैदानात प्रचंड हिंसाचार माजवण्यात आला होता. त्यातील काही लोकांनाच पकडण्यात आले. हे आपले अपयश म्हणावे लागेल. २. अपप्रचार युद्ध : जानेवारी २०२१ मध्ये देशात लस देण्याचा कार्यक्रम चालू झाला, तेव्हा ‘ही लस सुरक्षित नाही. त्यामुळे माणसांचा मृत्यू होऊ शकतो’, असा अपप्रचार करण्यात आला. त्यामुळे ३० ते ४० टक्के लोकांनी ही लस घेतलीच नव्हती. हे होते अपप्रचार युद्ध ! ३. सायबर आतंकवाद : इंटरनेटच्या माध्यमातून आक्रमण करण्यात येते, त्याला ‘सायबर आतंकवाद’ म्हणतात. काही मासांपूर्वी महाराष्ट्रातील वीज प्रणालीवर सायबर आक्रमण करण्यात आले होते. त्यामुळे मुंबईतील वीज १२ घंटे बंद पडली होती. त्यातून देशाची अब्जावधी रुपयांची हानी झाली. यामागे चीनचे कारस्थान होते. ४. घातपाती आतंकवाद : गेट वे ऑफ इंडियाजवळ एक बुचर आयर्लंड नावाचे बेट आहे. तेथे विदेशातून आलेले खनिज तेल साठवले जाते. त्या ठिकाणी आग लागून ३०० कोटी रुपयांचे तेल नष्ट झाले. हाही घातपातच होता. नागपूरजवळ कामठीला भारतीय सैन्याचा सर्वांत मोठा कारखाना आहे. तेथे आग लागली होती. तेव्हा ७०० ते ८०० कोटी रुपयांचा दारूगोळा नष्ट झाला होता. या अशा घटना पहाता भारताला पाकिस्तानी हस्तकांपासून सतर्क राहिले पाहिजे. ५. जैविक आतंकवाद : मागील दीड वर्षापासून चीनने जैविक महायुद्ध चालू केले आहे. यात भारताची प्रचंड प्रमाणात हानी झाली. यात दीड लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. वारंवार दळणवळण बंदी लावली गेली. त्यामुळे मोजता येणार नाही, एवढी आर्थिक हानी झाली आहे. एवढे होऊनही आपले लोक आपसांत भांडण्याचे काम करतात; पण चीनला खडसावायला कुणीही सिद्ध नाही. प्रथमच आपली अर्थव्यवस्था वाढण्याऐवजी ती मागे आली. |