कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेमुळे भारतात आणि विशेषकरून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात परत एकदा नागरिकांना विविध स्वरूपाच्या कठीण संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्यांचे अक्षरशः हाल होत आहेत. याला प्रशासन आणि नागरिक यांच्या चुका, भ्रष्टाचार, भोंगळ कारभार, नियोजनाचा अभाव यांमुळे विलंबाने अन् अपुर्‍या प्रमाणात मिळणारे वैद्यकीय उपचार, औषधांचा तुटवडा, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून मिळणारी अयोग्य वागणूक आदी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. त्यामुळे कोरोना महामारीच्या माध्यमातून नागरिकांना आता आपत्काळाची दाहक झळ बसत आहे. या महामारीच्या संकटाशी लढतांना नागरिकांना कोणत्या समस्या आणि अडचणी यांना सामोरे जावे लागत आहे, याची भयावहता लक्षात यावी, यासाठी हे सदर चालू करत आहोत. यातून वाचकांनाही आपत्काळाची भीषणता लक्षात येऊन काय सावधानता बाळगायला हवी, हे लक्षात येईल.

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘अशा आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी भगवंताचे भक्त बना आणि साधना वाढवा. अन्य कुणीही नाही, तर भगवंतच वाचवील !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

अंत्यसंस्कारासाठी निधीची कमतरता असल्याने मडगाव येथील हॉस्पिसियो रुग्णालयातील शवागार भरले

प्रतीकात्मक चित्र

मडगाव – कोरोनामुळे मृत्यू झालेल्या भिकार्‍यांवर अंत्यसंस्कार करण्यास निधीची अडचण निर्माण झाल्याचे २० एप्रिलला वृत्त होते. यामुळे हे बेवारस मृतदेह हॉस्पिसियो रुग्णालयाच्या शवागारात ठेवणे भाग पडले होते. मागील ४ दिवसांत कोरोनामुळे निधन झालेल्या ४ मृतदेहांसह एकूण ११ मृतदेह शवागारात पडून होते. शवागार मृतदेहांनी भरल्याच्या घटनेची दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी रूचिका कटयाल यांनी २० एप्रिल या दिवशी गंभीरपणे नोंद घेतली. जिल्हाधिकारी रूचिका कटयाल यांच्या हस्तक्षेपामुळे मडगाव नगरपालिकेने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या २ मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. मडगाव नगरपालिकेने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या उर्वरित २ मृतदेहांची, तसेच अन्य ११ मृतदेहांची विल्हेवाट लावण्याचे ठरवले आहे. निधीच्या कमतरतेचा प्रश्‍न त्वरित सोडवण्याचेही जिल्हा प्रशासनाने ठरवल्याचे समजते.

गतवर्षी कोरोनामुळे मृत्यू आलेल्या भिकार्‍यांवर मडगाव नगरपालिकेने अंत्यसंस्कार केले होते आणि यासाठी लागणारा निधी जिल्हाधिकारी कार्यालयातून पुरवला जाणार होता; मात्र प्रत्यक्षात गेल्या वर्षीचा निधी पालिकेपर्यंत अजूनही पोचला नाही. गेल्या वर्षीचा निधी न मिळाल्याने पालिका अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेत नव्हती. त्यात उपजिल्हाधिकारी कार्यालयातून भिकार्‍यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी निधी देऊ नये, असा आदेश निघाल्याने या समस्येत आणखीनच भर पडली होती. एरवी मृत भिकारी किंवा बेवारसी व्यक्ती यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पालिका पुढाकार घेत असते. त्याचे दायित्व मडगाव पालिकेतील एका अधिकार्‍यावर आहे; मात्र सध्या हा अधिकारी नगरपालिका निवडणुकीत व्यस्त आहे.

 

रेमडेसिविर इंजेक्शनच्या नावाखाली खारे पाणी आणि अ‍ॅन्टीबायोटिक्स मिसळून विकणार्‍या परिचारिकाला अटक

संपूर्ण देशात आपत्काळ निर्माण झाला असतांना अशा प्रकारची फसवणूक करून रुग्णांच्या जिवाशी खेळणार्‍यांना कठोर शिक्षा दिली पाहिजे !

रिसायकल केलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या बाटल्या दाखवतांना पोलिस

 म्हैसुरू (कर्नाटक) – येथे रेमडेसिविर इंजेक्शनच्या नावाखाली त्याच्या बाटलीतून खारे पाणी आणि अ‍ॅन्टीबायोटिक्स मिसळून विकणार्‍या गिरीश नावाच्या एका परिचारिकाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, अशा प्रकारच्या इंजेक्शनची विक्री करण्याचे काम गिरीश करत होता. तो एका टोळीचा मुख्य सूत्रधार आहे. तोे विविध आस्थापनांच्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या बाटल्या रिसायकल करून त्यात खारे पाणी आणि अ‍ॅन्टीबायोटिक्स भरून विकत होता. तो वर्ष २०२० पासून असे करत होता. गिरीशनेच त्याच्या सहकार्‍यांसह गेल्या वर्षभरापासून अशा प्रकारची फसवणूक करत असल्याची माहिती दिली.

 

बेंगळुरू येथे वाढत्या गर्दीमुळे टोकन घेऊन मृतदेहांवर अंत्यसंस्कार

भारतात जगण्यासाठीही संघर्ष करावा लागतो. आता मृत्यूनंतरही अंत्यसंस्कारासाठी रांग लावावी लागत आहे, यावरून तरी भारतीय जागे होतील आणि साधना करतील, अशी अपेक्षा !

प्रतीकात्मक चित्र

बेंगळुरू – कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे देशात मृतांची संख्याही वाढत आहे. गेल्या २४ घंट्यांत देशात २ सहस्र २० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या मृत्यूंमुळे स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी रांगा लागल्या आहेत. शहरातील स्मशानभूमीमध्ये होणारी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी आता टोकन पद्धतीचा प्रारंभ करण्यात आला आहे. दिवसभर रांगेत वाट पाहून मध्यरात्री अंत्यसंस्कार केले जात आहेत.

कोरोनाच्या काळात आलेले कटू अनुभव समाजाच्या प्रबोधनासाठी लिखित स्वरूपात त्वरित कळवा !

आपणासही अशा प्रकारचे कटू अनुभव आले असल्यास आरोग्य साहाय्य समितीस पुढील पत्त्यावर त्वरित कळवा. समाजाच्या प्रबोधनासाठी असे अनुभव त्वरित लिखित स्वरूपात कळवणे, ही काळानुसार समष्टी साधना आहे, हे लक्षात घेऊन साधक, वाचक, हितचिंतक, धर्मप्रेमी आणि विज्ञापनदाते यांनी त्यांना किंवा परिचितांना येणारे कटू किंवा चांगले अनुभव त्वरित पाठवावेत.

आरोग्य साहाय्य समिती

पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा. ४०३ ४०१.  संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१०

ई-मेल पत्ता : [email protected]