मशिदींवरील भोंग्यांमुळे त्रास होत असल्याने न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्यास सांगा ! – उत्तरप्रदेशच्या मंत्र्यांचे जिल्हाधिकार्‍यांना पत्र

उत्तरप्रदेशच्या मंत्र्यांचे जिल्हाधिकार्‍यांना पत्र

यापूर्वीच अलाहाबाद केंद्रीय विद्यापिठाच्या कुलगुरूंनीही अशा प्रकारची तक्रार केली होती. राज्यातील जनतेला मशिदींवरील भोंग्यांमुळे त्रास होत असतांना प्रशासन आणि पोलीस बहिरे झाले आहेत का ? आता मंत्रीही याविरोधात बोलू लागल्यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नियमबाह्यरित्या मशिदींवर लावण्यात आलेल्या भोंग्यांवर कारवाई करावी, असेच हिंदूंना वाटते !

मंत्री आनंद स्वरूप शुक्ल

बलिया (उत्तरप्रदेश) – येथील भाजपचे आमदार आणि राज्याच्या भाजप सरकारमधील मंत्री आनंद स्वरूप शुक्ल यांनी जिल्हाधिकार्‍यांना पत्र लिहून मशिदींवर लावण्यात येणार्‍या भोंग्यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे पालन करवून घेण्यास सांगितले आहे.

१. शुक्ल यांनी लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे की, शाळांतील शिक्षक, विद्यार्थी यांच्याकडून तक्रारी येत आहेत की, गावांतील मशिदींवरील भोंग्यांवरून दिवसभर विविध प्रकारच्या उद्घोषणा करण्यात येत आहेत. यामुळे लोकांना त्रास होत आहे. माझ्या घराजवळही एक मशीद आहे. येथे दिवसभर धन अर्पण करण्याचा संदेश दिला जातो. यामुळे मला योग, ध्यान आणि पूजा करण्यामध्ये अडथळा निर्माण होत आहे.

२. शुक्ल यांनी पत्रकारांशी बोलतांना म्हटले की, मंदिरांवर लावण्यात येणार्‍या भोंग्यांवरून अशा प्रकारच्या उद्घोषणा कधीही करण्यात येत नाहीत किंवा केल्यास त्यामुळे लोकांना त्रास होत नाही. केवळ धार्मिक कार्यासाठी मंदिरांवरील भोंग्यांचा वापर केला जातो; मात्र याउलट मशिदींवरील भोंग्यांचा पहाटे ४ वाजल्यापासून वापर केला जातो. यामुळेच लोकांना अधिक त्रास होत आहे.

बुरख्यावरही बंदी घाला !

आनंद स्वरूप शुक्ल यांनी ‘बुरखा परिधान करणे, ही अमानवीय घटना आहे. ही एक कुप्रथा आहे. त्यामुळे तोंडी तलाक प्रमाणे मुसलमान महिलांना बुरखा घालण्यापासून मुक्ती देण्यात यावी’, असे म्हटले आहे. ‘जे सुधारणावादी विचारसरणीचे आहेत, ते स्वतः बुरखा घालत नाहीत किंवा अन्य जणांना तसे करण्यास प्रोत्साहितही करत नाहीत’, असेही ते म्हणाले.

लक्ष्मणपुरीचे मौलाना खालिद रशीद फिरंगी महली यांनी यावर प्रतिक्रिया देतांना म्हटले की, बुरख्यावर बंदी घालण्याचा अधिकार कुणालाही नाही. (जगातील अनेक देशांनी सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यावर बंदी घातली आहे, हे महली यांना ठाऊक नाही कि ते वेड पांघरून पेडगावला जात आहेत ? – संपादक) काही धार्मिक गोष्टी आमच्या धर्माचा भाग आहेत आणि राज्यघटनेने धर्माचे पालन करण्याचा अधिकार दिला आहे. संपूर्ण जगामध्ये कोरोनामुळे लोक तोंडावळा लपवत आहेत, तेथे बुरखा योग्यच आहे. (मग कोरोना संपल्यावर बुरखा घालण्याचे बंद करण्यात येईल, असे समजायचे का ? – संपादक)