कोल्हापूर, १९ मार्च (वार्ता.) – विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीने केलेल्या घंटानाद आंदोलनात प्रारंभी श्री. किरण दुसे यांनी प्रास्ताविक केले. यानंतर विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे सदस्य, तसेच शिवसेना करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव, श्री महालक्ष्मी भक्त समितीचे श्री. प्रमोद सावंत, शिवसेनेचे श्री. किशोर घाडगे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे यांनी मनोगत व्यक्त केले.
या वेळी मलकापूर येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. रमेश पडवळ, हिंदु एकता आंदोलनचे श्री. चंद्रकांत बराले, श्री. बापू वडगावकर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. विजय आरेकर, ग्राहक संरक्षण सेनेचे तालुकाप्रमुख श्री. दीपक यादव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी आणि श्री. बाबासाहेब भोपळे, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री रामभाऊ मेथे, धनंजय यादव, किरण पाटील, आदित्य कराडे, प्रणव साळुंखे उपस्थित होते.
विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवून दोषी अधिकार्यांवर कठोर कारवाई करा ! – सुनील घनवट, प्रवक्ते, विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती
शिवछत्रपतींचा विशाळगडरूपी असलेला अमूल्य ठेवा राज्याचे पुरातत्व खाते आणि जिल्हा प्रशासन यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे दुरवस्थेत आहे. गडावर ६४ ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. गडांवरील प्राचीन मंदिरांची पडझड झालेली आहे आणि मूर्ती भग्नावस्थेत आहेत. शूरवीर बाजीप्रभु देशपांडे, फुलाजीप्रभु देशपांडे आणि छत्रपती शिवरायांच्या सूनबाई अहिल्याबाई भोसले यांच्या समाध्या अत्यंत दुर्लक्षित आहेत. याउलट गडावर रेहानबाबा दर्ग्याच्या परिसराच्या सुशोभिकरणासाठी शासनाकडून लाखो रुपये निधी उपलब्ध होत आहे, तेथे जाण्यासाठी पेव्हर ब्लॉकचा रस्ता आहे. दर्ग्याचे आर्.सी.सी. बांधकाम झाले आहे. तरी विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवून दोषी अधिकार्यांवर कठोर कारवाई करा आणि गडावरील ऐतिहासिक स्मारके, विविध नरविरांच्या समाधी अन् मंदिरे यांची कालमर्यादा ठेवून जीर्णोद्धार करा.
या वेळी केर्ले, पडवळवाडी, निगवे-दुमाला, प्रयाग चिखली, उंचगाव, शिरोली, दानोळी, कसबा-सांगाव या गावांतील हिंदुत्वनिष्ठ आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले होते.
आंदोलनात करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या
१. वर्ष १९९८ पूर्वीच्या नोंदी ग्राह्य धरून उर्वरित सर्व बांधकामे आणि अतिक्रमणे एका मासाच्या आत शासनाने काढून टाकावीत. विशाळगडावर झालेले अतिक्रमण, मंदिरे-समाध्यांची दुरवस्था याला कारणीभूत असणार्या पुरातत्व आणि अन्य खाती यांच्या अधिकार्यांवर गुन्हे नोंदवावेत.
२. पन्हाळा ते विशाळगड हा एकमेवाद्वितीय रणसंग्राम लोकांसमोर येण्यासाठी याचे एक ऐतिहासिक भव्य स्मारक उभारण्यात यावे. गडाच्या पायथ्यापासून गडाच्या टोकापर्यंत असणारी सर्व मंदिरे, धार्मिक, ऐतिहासिक ठिकाणे यांचे महत्त्व सांगणारे फलक जागोजागी लावावेत.
३. गडाचे पावित्र्य भंग करणार्या गोष्टींवर (उदा. मद्यपान, मांसविक्री), तसेच आरोग्यास हानी पोचवणार्या सर्वच गोष्टींना प्रतिबंध करावा.
मान्यवरांनी व्यक्त केलेले मनोगत
१. श्री. प्रमोद सावंत – हे आंदोलन केवळ कृती समितीचे नसून ते सामान्य जनतेचेही आहे. त्यामुळे या मागण्यांची नोंद शासनाने घेणे अपेक्षित आहे.
२. श्री. किशोर घाटगे – पावनखिंडीचा इतिहास जाणून घेण्यासाठी सार्या देशभरातून शिवभक्त येतात. अशा शिवभक्तांसाठी या संग्रामाचे स्मारक नसणे हे दुर्दैवी आहे. विशाळगडावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असून त्याचे इस्लामीकरण होत आहे. एका मासाच्या आत पुरातत्व खात्याने हे अतिक्रमण काढून न घेतल्यास शिवभक्तांनाच त्याविषयी निर्णय घ्यावा लागेल.
३. श्री. सुरेश यादव – पुरातत्व खात्याने मागण्या मान्य न केल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल.
४. श्री. राजू यादव – विशाळगडावर घरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून याकडे पुरातत्व खाते डोळेझाक करत आहेत. अशा झोपलेल्या पुरातत्व खात्याचा मी धिक्कार करतो.
राज्यभर ऑनलाईन आंदोलन आणि ठिकठिकाणी निवेदन !
कोल्हापूर – विशाळगडावरील अतिक्रमण, ऐतिहासिक ठिकाणे, स्मारके-समाधी यांची दुरवस्था यांविषयी आवाज उठवण्यासाठी विविध गडप्रेमी संघटना, हिंदुत्वनिष्ठ संघटना, हिंदुत्वनिष्ठ, शिवभक्त आणि हिंदु जनजागृती समिती यांनी राज्यभर ‘ऑनलाईन’ आंदोलन केले. याचसमवेत राज्यातील अनेक ठिकाणी जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
क्षणचित्रे
१. आंदोलनाच्या प्रारंभी सर्व मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या मुद्रेला माल्यार्पण केले.
२. आंदोलनाच्या वेळी तेथून जाणारे सौंदलगा येथील शाहीर संदीप मोहन पडवाळे-पाटील यांनी उत्स्फूर्तपणे पोवाडा सादर केला.
३. आजूबाजूचे अनेक नागरिक थांबून आंदोलन पहात होते.
४. आजच्या आंदोलनास लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या पोलिसांचे चांगले सहकार्य लाभले. याविषयी कृती समितीच्या वतीने आभार मानण्यात आले.
५. या वेळी ‘विशाळगडावरील अतिक्रमण रोखा, शिवकालीन इतिहासाचे जतन करा !’, ‘विशाळगड अतिक्रमणमुक्त करा !’ ‘अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करणार्या पुरातत्व खात्याचा धिक्कार असो’ यांसह देण्यात आलेल्या घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक दणाणून गेला.