दळणवळण बंदीच्या काळात साधनेचे प्रयत्न करून सातत्याने गुरुतत्त्व अनुभवणारी ५९ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली रत्नागिरी येथील कु. अपाला औंधकर (वय १३ वर्षे) !
‘दळणवळण बंदीच्या काळात समाजातील काही मुले सकाळी उशिरा उठणे, दिवसभर खेळणे, घरातील भावंडांशी भांडणे, भ्रमणभाषवरील खेळ खेळणे, असा वेळ घालवत आहेत; पण ‘या आपत्काळातही केवळ परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे सनातनचे बालसाधक साधना करून गुरुकृपा अनुभवत आहेत’, हे आम्हा सर्वांचे अहोभाग्य आहे. या कालावधीमध्ये कु. अपाला औंधकर हिने केलेले साधनेचे प्रयत्न आणि त्यामुळे तिच्यामध्ये झालेले पालट येथे दिले आहेत.
(‘वर्ष २०१७ मध्ये कु. अपाला औंधकर हिची आध्यात्मिक पातळी ५६ टक्के होती.’ – संकलक)
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. अपाला औंधकर ही आहे !
१. व्यष्टी साधनेचे प्रयत्न नियमित करणे
१६.३.२०२० पासून शाळा बंद झाल्या. त्यानंतर अपाला कुठेही बाहेर गेली नाही. आरंभीच्या काही दिवसांत तिला थोडा कंटाळा आला; पण नंतर तिच्याकडून व्यष्टी साधनेचे प्रयत्न नियमित चालू झाले.
सकाळी लवकर उठणे, प्रतिदिन दोन घंटे बसून नामजप करणे, सातत्याने प्रार्थना अन् कृतज्ञता, क्षमायाचना, आत्मनिवेदन करणे, इंद्रियांची बैठक घेणे, बालसंस्कारवर्ग ऐकणे आणि स्वभावदोष निर्मूलनाचे प्रयत्न चालू केले. या सर्व प्रयत्नांमुळे तिच्यात चांगला पालट जाणवू लागला. तिच्या तोंडवळ्यावर चैतन्याचा परिणाम दिसू लागला आहे.
२. कलेची आवड निर्माण होणे
अ. अपालाने यापूर्वी कधीही चित्रकलेची आवड दाखवली नाही. या वेळी तिला चित्रे काढावीशी वाटली. अपालाने पू. उमा रविचंद्रन् यांनी काढलेली बालकभावातील चित्रे काढण्यास आरंभ केला आणि तिला आपोआप चित्रकलेची आवड निर्माण झाली. त्या समवेत तिने पौराणिक कथांवर आधारित चित्रेही काढली. त्यामुळे तिला त्या कथाही समजू शकल्या.
आ. तिने नृत्य सराव भावपूर्ण करण्याचा प्रयत्न केला. देवतांची स्तुतीगीते आणि श्लोक यांवर तिने अनेक वेगवेगळी नृत्ये बसवली. परात्पर गुरुदेवांच्या जन्मदिनानिमित्त तिने घरीच नृत्य केले आणि आनंद अनुभवला.
३. शिकण्याची वृत्ती वाढणे
दूरदर्शनवर येणार्या ‘रामायण आणि महाभारत’ या मालिका पाहिल्यावर तिने जिज्ञासाने अनेक प्रश्न विचारून माहिती करून घेतली. ‘त्या मालिका बघून त्यातून शिकायला काय मिळाले ?’, हेही ती मला सांगायची, उदा. महाभारतातील पांडवांकडून तिला सहनशक्ती, आज्ञापालन आणि नम्रता हे गुण शिकायला मिळाले.
४. नामजपाचे महत्त्व लक्षात घेणे
अ. एकदा तिच्या नामजपाची वेळ होती आणि त्याच वेळी तिच्या अक्षतामावशीचा भ्रमणभाष आला. त्या वेळी ती मावशीला म्हणाली, ‘‘मी आता नामजप करणार आहे. तुझ्याशी नंतर बोलते.’’ या प्रसंगात अपालाने नामजपाला महत्त्व दिल्याचे पाहून मला आणि अक्षतालाही तिचे कौतुक वाटले.
आ. अपाला नामजपाला बसतांना ‘रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात बसले आहे’, असा भाव ठेवते. त्यामुळे तिचा नामजप भावपूर्ण होतो.
५ . आश्रमात असल्याप्रमाणे कृती करणे
अ. अपाला प्रत्येक उन्हाळ्याच्या सुटीत रामनाथी (गोवा) सनातनच्या आश्रमात असते. या वेळी तिला आश्रमात जायला मिळाले नाही, याची तिला सातत्याने खंत वाटत आहे; पण म्हणून ती दुःखी न रहाता तिने घरी राहूनही आश्रमाचे चैतन्य अनुभवण्याचा प्रयत्न केला.
आ. एकदा मी तिला म्हणाले, ‘‘आपण आश्रमातच रहात आहोत, असा भाव ठेवूया.’’ त्यावर ती मला म्हणाली, ‘‘आई, मी प्रत्येक क्षण आश्रमातच असते. मी देहाने जरी इथे असले, तरी माझे मन आश्रमातच आहे.’’ हे ऐकल्यावर माझी भावजागृती होऊन गुरुदेवांविषयी कृतज्ञता व्यक्त झाली.
इ. एकदा ती म्हणाली, ‘‘मी सूक्ष्मातून आश्रमात जाते. प्रवेश करण्यापूर्वी तीर्थ शिंपडून ध्यानमंदिरात जाते. त्यानंतर माझ्या सेवेच्या ठिकाणी जाऊन सर्वांना भेटते आणि परत येते. माझ्या चुका भोजनकक्षाच्या फलकावर लिहिते आणि तिथे उभी राहून क्षमा मागते.’’ हे ऐकल्यावर मला तिचे पुष्कळ कौतुक वाटले.
ई. भोजन करतांना ‘प्रत्येक वेळी भाजीची चव आश्रमातील भाजीसारखी आहे. आज आश्रमातील भोजनकक्षातील सुवास येत आहे’, असे अनेक वेळा सांगून ती आश्रमातील आठवणी काढून बोलते.
‘अपाला सतत आश्रमाची आठवण काढते. त्यामुळे ती आपोआपच आश्रमात असल्याप्रमाणे घरात वावरत आहे आणि ती आश्रमातील साधिकांप्रमाणे दिसत आहे’, असे मला जाणवते.
६. इतरांकडून साधनेचे प्रयत्न करवून घेणे
अ. कु. अपाला तिच्या आजोबांकडून (वय ७२ वर्षे) प्रतिदिन कुलदेवीचा नामजप लिहून घेत आहे. त्यांचा नामजप लिहून झाल्यावर अपाला ‘आबा, चांगले लिहिले आहे. तुम्ही लिहिलेला नामजप देवीलाही आवडला आहे’, असे कौतुक करते. हे पाहून ‘परात्पर गुरुदेवांची शिकवण किती अनमोल आहे’, याची मला जाणीव झाली आणि ‘प्रत्येक जिवाकडून गुरुदेव साधना करवून घेतात’, याची जाणीव झाली.
आ. अपाला तिच्या काही वर्गमित्र-मैत्रिणींना ‘ऑनलाईन बालसंस्कारवर्ग’ ऐकण्यासाठी ‘लिंक’ पाठवते. त्यातील एकाने बालसंस्कारवर्ग ऐकल्यावर ‘स्वभावदोष सारणी लिखाण करणार’, असे अपालाला सांगितले.
वरील प्रसंगांतून ‘गुरुदेव प्रत्येक जिवाकडून व्यष्टी आणि समष्टी साधना करवून घेत आहेत’, असे मला वाटले.
७. कु. अपालाचे जाणवलेले स्वभावदोष
अ. उलट उत्तरे देणे
आ. धांदरटपणा
इ. भ्रमणभाषचा अती वापर करणे
ई. सांगितलेली गोष्ट पटकन न ऐकणे
८ . अनुभूती
कु. अपालाच्या हनुवटी आणि गाल यांवर आलेले काळे डाग औषधोपचाराने न्यून न होणे आणि तिच्या व्यष्टी साधनेची घडी बसल्यावर ते डाग आपोआप नाहीसे होणे : गेले वर्षभर अपालाची हनुवटी आणि गाल यांवर काळे डाग पडले होते. ते न्यून होण्यासाठी आम्ही पुष्कळ प्रयत्न केले; पण काही उपयोग झाला नाही. त्वचारोग तज्ञांकडे जाऊन औषधोपचारानेही काही लाभ झाला नाही. ते डाग वाढतच होते. दळणवळण बंदीच्या काळात शाळा बंद झाल्यावर अपालाची व्यष्टी साधनेची घडी बसल्यावर ते डाग आपोआप नाहीसे झाले.
९ . अपालाच्या नावाचा अर्थ समजल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांविषयी कृतज्ञता वाटणे
अपालाचे नामकरण केले, त्या वेळी मला ते नाव आवडले नव्हते. परात्पर गुरु डॉक्टरांनीही ‘अर्थ समजण्यास कठीण असणारी नावे ठेवू नयेत’, अशी दैनिक ‘सनातन प्रभात’ मध्ये चौकट दिली होती. तेव्हापासून ‘आपण हे नाव उगाचच ठेवले’, असे मला वाटत होते.
काही दिवसांपूर्वीच मला ‘अपाला’ या नावाचा अर्थ समजला. ‘अपाला म्हणजे जिचे पालन करावे लागत नाही, अशी.’ खरंच, जिचे पालन साक्षात् श्रीमन्नारायण स्वरूप परात्पर गुरुदेवच करत आहेत, तिचे आम्ही आई-वडील म्हणून पालन करूच शकत नाही.
‘हे गुरुदेवा, तुम्ही ‘कु. अपाला’ मला दिलेले दायित्व आहे, ती तुमचीच आहे. तिला लवकर तुमच्या चरणी घेऊन माझे दायित्व तुम्हीच पूर्ण करवून घ्या’, अशी तुमच्या चरणी कोटीशः प्रार्थना करते.’
– सौ. दीपा अमित औंधकर , रत्नागिरी (२२.५.२०२०)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |