व्यष्टी साधनेचा आढावा घेतांना सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी करून घेतलेली मनाची सिद्धता आणि त्या वेळी जाणवलेली सूत्रे

सद्गुरु राजेंद्र शिंदे

​‘२५.१.२०२० या दिवशी मी सद्गुरु राजेंद्र शिंदे घेत असलेल्या व्यष्टी साधनेच्या आढाव्याला गेले असतांना प्रार्थना आणि भावप्रयोग झाल्यावर सद्गुरु राजेंद्र शिंदे मला अकस्मात् म्हणाले, ‘‘आज महानंदाताई (कु. महानंदा पाटील) आढावा घेतील.’’ तेव्हा ‘मी आढावा कसा घेणार ?’, असा विचार करत होते. मी त्यांना केवळ हसून प्रतिसाद दिला. त्या वेळी साधक माझ्याकडे आणि मी त्यांच्याकडे पहात होते. तेव्हा ‘ते मला एकाच साधकाचा आढावा घेण्यास सांगतील’, असा विचार करून मी साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेण्यास आरंभ केला. सद्गुरु राजेंद्रदादांनी मागील आठवड्यात दिलेल्या गृहपाठानुसार एका साधकाला त्याविषयी विचारून त्याच्या साधनेचा आढावा घेतला. दुसर्‍या आणि तिसर्‍या साधिकेच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेतल्यावर सद्गुरु राजेंद्रदादा मला म्हणाले, ‘‘तुम्ही सर्वच साधकांचा आढावा घ्या. नंतर मी तुमचा आढावा घेईन.’’

कु. महानंदा पाटील

१. साधकांना अयोग्य रितीने प्रश्‍न विचारत असल्याची जाणीव करून देणे, ‘एका साधिकेच्या उदाहरणातून योग्य प्रश्‍न कसे विचारायचे ?’, हेही शिकवणे आणि त्या माध्यमातून व्यष्टी साधनेचा आढावा घेण्याची सिद्धता करवून घेत असल्याचे जाणवणे

आढाव्यात मी साधकांना अयोग्य रितीने प्रश्‍न विचारल्यास सद्गुरु राजेंद्रदादा मला त्याची जाणीव करून देत होते आणि ‘प्रश्‍न कसा विचारायचा ?’, हेही मला सांगत होते. एका काकूंनी ‘एक साधिका सेवेच्या ठिकाणची स्वच्छता करत नाही. तिला वाताचा त्रास आहे. ‘त्या साधिकेने सेवेच्या ठिकाणची स्वच्छता करावी’, अशी माझी अपेक्षा असते’, असे सांगितले. तेव्हा मी विचारले, ‘‘ती घरी स्वच्छता कशी करते ?’’ तेव्हा सद्गुरु राजेंद्रदादा मला म्हणाले, ‘‘असा प्रश्‍न विचारायला नको. घरी काय एक खोली असते. कोणी प्रतिदिन पुसत नाही. ३ – ४ दिवसांनी एकदा लादी पुसतात’’ तेव्हा ‘व्यष्टी साधनेचा आढावा घेणार्‍या साधकाने योग्यच प्रश्‍न विचारला पाहिजे’, हे त्या वेळी माझ्या लक्षात आले. ‘जणू ते माझी परीक्षाच घेत आहेत. शाळेत अंतिम परीक्षा घेण्यापूर्वी जसे चाचणी परीक्षा घेतात, तसे ते माझी व्यष्टी साधनेचा आढावा घेण्याची सिद्धता करवून घेत होते’, असे मला जाणवले.

२. व्यष्टी साधनेचा आढावा घेतांना जाणवलेल्या सूत्रांविषयी आढाव्यात सांगितल्यावर सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देणे

साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेऊन झाल्यावर सद्गुरु राजेंद्रदादा मला म्हणाले, ‘‘आढावा घेतांना काय लक्षात आले ?’, ते पुढच्या आढाव्याला येतांना लिहून आणा.’’ त्यांनी मला हा गृहपाठ दिला. त्याप्रमाणे मी ती सूत्रे लिहिली आणि पुढील व्यष्टी साधनेच्या आढाव्यात वाचून दाखवली. त्या वेळी सद्गुरु राजेंद्रदादा मला म्हणाले, ‘‘हो, छान.’’

३. ‘व्यष्टी साधनेचा आढावा घेण्यासाठी प्रत्येकच साधक सिद्ध व्हावा’, अशी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांची तळमळ असणे

‘प्रत्येक साधक व्यष्टी साधनेचा आढावा घेण्यासाठी सिद्ध झाला पाहिजे. त्याला कोणत्याही क्षणी आढावा घ्यायला सांगितल्यावर त्याने आढावा घेतला पाहिजे’, अशी सद्गुरु राजेंद्रदादांची तळमळ असते’, असे मला जाणवले. ते साधकांच्या मनाची सिद्धता करवून घेतात. ‘प्रत्येक साधकाची साधना व्हावी’, असे त्यांना वाटत असते. ते प्रत्येकाला पुढच्या टप्प्यात जाण्यासाठी मार्गदर्शनही करतात.’

– कु. महानंदा गिरिधर पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (४.३.२०२०)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक