कर्नाटकातील भाजपच्या नेत्यांचे वक्तव्य अयोग्य ! – चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, भाजप

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

सोलापूर – कर्नाटकमधील भाजपचे नेते करत असलेले वक्तव्य अयोग्य असून आम्ही त्याचा निषेध करतो. याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना भेटून आम्ही आमचे म्हणणे मांडणार आहोत. कर्नाटकमधील भाजप नेत्यांचे आम्ही समर्थन करत नाही. कर्नाटकातील ८४२ गावांमध्ये असलेले मराठी भाषिक हे आपल्या भूभागासह महाराष्ट्रामध्ये यायला हवेत, अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मांडली. पक्षाच्या आढावा बैठकीसाठी चंद्रकांत पाटील हे सोलापूर दौर्‍यावर होते. त्या वेळी बोलत होते.

पाटील पुढे म्हणाले की, मराठा आरक्षणावरून समाजाची दिशाभूल करण्यासाठी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चालू आहे. कामगारांच्या प्रश्‍नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी हा वाद उपस्थित केला जात आहे. दळणवळण बंदीच्या काळात बेरोजगार झालेल्या एकाही असंघटित कामगाराला राज्य सरकारने साहाय्य केले नाही. धनंजय मुंडे प्रकरणात त्यांनी त्यांचे त्या महिलेशी संबंध असल्याचे मान्य केले, तरीही त्यांना ‘क्लीन चिट’ देण्यात आली. हे नैतिकतेमध्ये बसते का ?, याचे उत्तर सरकारने द्यावे. अधिवेशनात या सर्व विषयावर आवाज उठवणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.