मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून वीजदेयकाच्या संदर्भात अनेक वेळा सरकारशी पत्रव्यवहार करण्यात आला होता. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची भेट घेण्यात आली होती. त्या वेळी लवकरात लवकर निर्णय घेऊ, असे आश्वासन देण्यात आले होते; परंतु कोणत्याही प्रकारचे आश्वासन पूर्ण न झाल्यामुळे २६ जानेवारी या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.
या संदर्भात मनसे माहीम विधानसभेचे अध्यक्ष यशवंत किल्लेदार म्हणाले, ‘‘आम्ही ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह बेस्ट आस्थापनाचे प्रमुख अधिकारी यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली आहे. अशा प्रकारच्या तक्रारी राज्यभरातून विविध पोलीस ठाण्यांत दिल्या जाणार आहेत. दळणवळण बंदी काळात मोठ्या प्रमाणात वीजदेयक देऊन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक केली आहे, असे आमचे म्हणणे आहे. त्यामुळे लवकरात लवकर ऊर्जामंत्री आणि बेस्ट आस्थापनाचे प्रमुख अधिकारी यांच्या विरोधात फसवणूक आणि मानसिक आघात पोचवणे अशा प्रकारचा फौजदारी गुन्हा नोंद करावा, अशी विनंती आम्ही पोलिसांना केली आहे.’’