२६ जानेवारी २०२१ या दिवशी प्रजासत्ताकदिन आहे. यानिमित्ताने…
१. भारताने २६ जानेवारी १९५० ला राज्यघटनेचा पूर्णपणे केलेला स्वीकार
२६ नोव्हेंबर १९४९ या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने स्वतंत्र भारताची राज्यघटना तेव्हाचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याकडे नेली. त्यानंतर २ मासांनी, म्हणजे २६ जानेवारी १९५० या दिवशी ती पूर्णपणे स्वीकारली गेली, म्हणजेच कार्यवाहीत आणली गेली; म्हणूनच आपण हा दिवस प्रजासत्ताकदिन या नावाने साजरा करतो.
२. सण म्हणून साजरा होत असलेला प्रजासत्ताकदिन
पूर्वी हा प्रजासत्ताक सोहळा एक सण म्हणून साजरा केला जात असे. समाजातील प्रतिष्ठित, तसेच लोकप्रतिनिधी यांच्यासह सामान्य नागरिकही त्यांच्या बालगोपाळांना घेऊन आनंदाने आणि जल्लोषाने या कार्यक्रमास उपस्थिती लावायचे. प्रत्येकाच्या हातात भारताचा झेंडा असायचा किंवा तो टाचणीने छातीवर टाचलेला असायचा. घराघरांवरही हा तिरंगा डौलाने फडकायचा.
३. प्रजासत्ताकदिनाविषयी मावळत चाललेला नागरिकांचा उत्साह
आता लोकांचा हा उत्साह मावळत चाललेला आहे, असे दिसते. लोकांच्या मनात असूनही आतंकवाद्यांच्या भीतीमुळे किंवा घातपातामुळे पुष्कळ अल्प लोक या कार्यक्रमास उपस्थित रहातात. काही जण तर तेथे न येण्याचेच पसंत करतात आणि घरात दूरदर्शन संचासमोर बसून हा सोहळा पहाण्याचे ठरवतात. काही जण यालाच जोडून सुट्टी घेतात आणि बाहेर कुठेतरी २-४ दिवस मौज-मजा करणे पसंत करतात. एकूणच या राष्ट्रीय सणांसाठी नागरिकांच्या उपस्थितीचा किंवा सहभागाचा उत्साह दिवसेंदिवस न्यून होऊ लागलेला आहे. तरी एक सोपस्कार म्हणून सरकारी यंत्रणा, सत्ताधारी, तसेच इतर लोकनियुक्त प्रतिनिधी हा कार्यक्रम उरकायचा म्हणून उरकतात आणि प्रजासत्ताकामध्ये एका वर्षाची भर पडली; म्हणून समाधान मानतात.
(संदर्भ : मासिक श्री गजानन आशिष, मार्च २०१७)