ठाणे येथील जिज्ञासूंना ‘ऑनलाईन’ नामजप सत्संग पुष्कळ आवडले. दळणवळण बंदी उठल्यानंतरही सत्संग चालू ठेवण्याविषयी त्यांनी आवर्जून सांगितले. त्यांपैकी काही जणांचे अभिप्राय २२ जानेवारी या दिवशी पाहिले. आज उर्वरित भाग पुढे देत आहोत.
भाग १ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/443912.html
७. वैष्णवी सांडे
अ. ‘आज ‘ऑनलाईन’ भाववृद्धी सत्संग ऐकल्यावर पुष्कळ छान वाटले. यापूर्वी नामजप करतांना माझ्या मनात विचार यायचे आणि मी नामजप विसरून जायचे; पण आज भाववृद्धी सत्संग ऐकतांना नामजप केला. तेव्हा माझ्या मनात काहीच विचार आले नाहीत. जे विचार आले, ते लगेच नाहीसे झाले.
आ. या आधी मला पुष्कळ कंटाळवाणे वाटायचे; पण आज मला नामजपानंतर फार छान वाटले. आज मला सकारात्मक ऊर्जा मिळाली आणि त्यामुळे पुष्कळ दिवसांनी आनंदी वाटत आहे. यासाठी मी श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
८. सौ. संध्या राडे
‘या रेल्वे पोलीस आहेत. त्यांचे कुटुंब अंबरनाथ येथे असते. सौ. संध्या यांचे स्थानांतर जळगाव येथे झाल्यामुळे सध्या त्या जळगाव येथे असतात. त्यांना जळगावला येऊन ६ मास झाले आहेत. त्या दळणवळण बंदीमुळे घरी येऊ शकत नव्हत्या. तेव्हा त्यांनी आम्हाला भ्रमणभाष करून साधनेविषयी माहिती विचारली. आपण त्यांना सत्संगांची ‘लिंक’ पाठवत आहोत. त्या त्यांना वेळ असेल, त्यानुसार ‘ऑनलाईन’ किंवा ध्वनीमुद्रित केलेले सत्संग पहातात. त्यांना सत्संग ऐकल्यामुळे मानसिक समाधान मिळत आहे. ‘नामजप करत असल्यामुळे देवाच्या कृपेने दळणवळण बंदीच्या काळात विशेष अडचणी आल्या नाहीत’, असे त्यांनी सांगितले.’
९. सौ. ज्योती कालेकर
‘मी पूर्वी सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करत होते. त्यामुळे मला भावजागृतीविषयी थोडीफार माहिती होती. आता मी नियमितपणे भाववृद्धी सत्संग ऐकायला लागल्यापासून ‘भाववृद्धीसाठी आपण अजून काय केले पाहिजे ?’, हे मला शिकून पुष्कळ आनंद मिळाला. पूर्वी माझे यजमान मला पुष्कळ विरोध करत होते; परंतु आता त्यांचा विरोध न्यून झाला आहे.’
१०. सौ. संजीवनी चाफेकर
‘मी ‘स्वामी समर्थ’ संप्रदायाच्या माध्यमातून साधना करते. साधना करतांना मला अनेक वेळा विविध अनुभूती आल्या आहेत. मी नियमितपणे सनातनचा भाववृद्धी सत्संग ऐकते. तेव्हा ‘मला आलेल्या अनुभूती सत्यच होत्या’, असे माझ्या लक्षात आले आणि ‘माझी साधना योग्य मार्गाने चालू आहे’, याची निश्चिती होऊन माझी भावजागृती झाली.’
११. लीना इंदूलकर
‘आपल्यामध्ये भाव कसा निर्माण करायचा ? भावावस्था कशी असते ? प्रत्येक गोष्टीत कसा भाव ठेवायचा ? निर्जीव वस्तूंप्रती भाव कसा असतो ?’, हे सर्व मला सनातनच्या सत्संगातून शिकायला मिळाले. सत्संग ऐकल्यावर भावजागृती होते आणि भावावस्था अनुभवायला मिळते. मी बहुतेक सत्संग रात्री ‘यू ट्यूब’वर ऐकते. त्यामुळे रात्रभर नामजप आणि भावावस्था अनुभवता येते.’
१२. श्रीमती गावकर
‘मी सर्व सत्संग ऐकते. सत्संग पुष्कळ सुंदर आहेत. मी नामजपही करते. मला माझ्या मैत्रिणी दूरभाष करतात. तेव्हा त्या या परिस्थितीत पुष्कळ कंटाळलेल्या अन् वैतागलेल्या दिसतात आणि ‘हे कधी संपणार ?’, असे मला विचारतात. तेव्हा मी देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करते; कारण देवाने मला या सत्संगांच्या माध्यमातून दिवसभर त्याच्या अनुसंधानात ठेवले आहे.’
१३. जयश्री म्हात्रे
‘मी नामसत्संग चालू झाल्यापासून एकही दिवस तो चुकवला नाही. काही अडचणीमुळे सकाळचा सत्संग ऐकता आला नाही, तर दुपारी ४ वाजताचा सत्संग नक्की ऐकते. नामसत्संगात पुष्कळ छान माहिती सांगतात. माझा प्रतिदिन नामजप होतो. ‘सत्संग कधी चालू होतो ?’, याची मला ओढ लागलेली असते.’
१४. डॉ. सुनीता साळुंके
‘मी प्रतिदिन न चुकता नामजप करते. सत्संगात नामस्मरण करतांना मला पुष्कळ छान आणि शांत वाटते. आज नामजप करतांना माझे सहस्रारचक्र उघडले असून ‘तिथे श्रीकृष्ण आहे’, असा मला भास होत होता. तेव्हा ‘गार वार्याच्या झुळुका आल्या’, असे वाटून मला वातावरणात गारवा जाणवला आणि फार छान वाटले.’
१५. डॉ. देवळे
‘त्यांनी सांगितले, ‘‘सत्संग पुष्कळ छान आहेत. दळणवळण बंदी संपल्यावरही सत्संग चालूच ठेवावेत.’’ त्यांना आपले सत्संग पुष्कळ आवडतात. ते त्यांचे मित्र असलेले आधुनिक वैद्य आणि नातेवाईक यांना सत्संग पाठवतात.’
१६. श्री. अनिल बसीन
‘कोरोनाच्या काळात आपल्याला देवाचाच आधार आहे. मी माझ्या कुटुंबाच्या समवेत प्रतिदिन ३० ते ४५ मिनिटे ‘ऑनलाईन’ सत्संग ऐकून नामजप करतो. ‘थोडा वेळ तरी नामजपासाठी दिला पाहिजे’, असे मला वाटते. मी कोरोना प्रतिबंधक नामजपही करतो.’
१७. सौ. अलका राणे
‘तू (संपर्कातील साधिका) प्रतिदिन सांगतेस, तो आपत्काळ आला आहे’, असे आता मला वाटायला लागले आहे. मी नामजप सत्संग प्रतिदिन ऐकते.’
(क्रमशः )
बालसंस्कार सत्संगाविषयी जिज्ञासूंनी व्यक्त केलेले मनोगत !
१. श्री. अभिजीत वैद्य
‘सनातन संस्थेची ‘बालसंस्कार सत्संग शृंखला’ सर्वोत्कृष्ट आहे. कालपासून चालू झालेली गुणसंवर्धन सारणी पुष्कळ छान आहे. ‘ती शाळेत १ घंटा शिकवली, तर विद्यार्थ्यांना आपले गुण किंवा अवगुण बारकाईने बघण्याची सवय लागेल आणि पुढे ती अधिक सजग रहातील’, असे मला वाटते. सत्संगात खेळाचे महत्त्व, आदर आणि कृतज्ञता यांविषयीही चांगले उद्बोधन केले आहे. सर्वांत वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे विषय मांडणारे वक्ते पुष्कळ शांतपणे सर्व सांगतात.’
२. अधिवक्त्या मधुरा नीलेश बागाव
‘माझी मुलगी कु. संचिता ही प्रतिदिन बालसंस्कार वर्ग ऐकते. ती ११ वर्षांची असून इयत्ता ६ वीत शिकत आहे. या बालसंस्कार वर्गामुळे तिच्यात झालेले पालट पुढे दिले आहेत.
१. आता ती सकाळी लवकर उठते आणि स्वतःचे आवरून सत्संग ऐकते. (याआधी तिच्या मागे लागावे लागत होते.)
२. आता ती ‘आई, मी तुला कामात काय साहाय्य करू ?’, असे विचारून प्रत्यक्ष साहाय्य करते, उदा. कपडे वाळत घालते.
३. आता ती सकाळी उठल्यावर देव आणि आई-वडील यांना नमस्कार करते. बालसंस्कार वर्गात सांगितलेल्या गोष्टी ती पालकांनाही सांगते.
४. तिने तिच्या दोन मैत्रिणींनाही ‘बालसंस्कार वर्ग ऐका. फार छान आहे’, असे सांगितले आहे. त्याप्रमाणे ‘त्याही बालसंस्कार सत्संग ऐकतात’, असे त्यांच्या पालकांनी सांगितले.
५. तिचे भ्रमणभाष आणि दूरचित्रवाणी यांवरील कार्यक्रम पहाण्याचे प्रमाण पुष्कळ न्यून झाले आहे.
६. तिचा ओरडण्याचा भागही न्यून झाला आहे. आता ती समजावून सांगण्याचा प्रयत्न करते.
‘दळणवळण बंदी संपल्यावरही हा बालसंस्कार सत्संग चालू ठेवा’, अशी मी विनंती करते.’
३. अधिवक्त्या प्राची कुलकर्णी
‘माझा मुलगा शर्वांग कुलकर्णी (वय १३ वर्षे) हा प्रतिदिन बालसंस्कार वर्ग ऐकतो. तो त्यातील सूत्रे आचरणात आणतो. ती सूत्रे पुढे दिली आहेत.
१. आता तो नियमित रामरक्षा आणि ‘शुभं करोती’ म्हणतो.
२. कधी माझे डोके दुखत असल्यास तो माझे डोके दाबून देतो. जेवणापूर्वी पाने घेणे, जेवणानंतर सर्व वस्तू उचलून आत ठेवणे, लादी पुसणे, कपडे धुण्यास साहाय्य करणे इत्यादी घरकामांतही तो मला साहाय्य करतो.’
(त्यांच्या मुलात सकारात्मक पालट झाल्यामुळे अधिवक्त्या प्राची कुलकर्णी यांची आमच्याशी जवळीक वाढली आहे. त्यामुळे त्यांनी अधिवक्ता सत्संगांना जोडण्याची सिद्धता दाखवली आहे.)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |