नांदेड – येथून पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी २ जानेवारी या दिवशी सकाळी मोटारसायकलींवरून अभिवादन फेरी काढत निघालेल्या १७ जणांवर वजिराबाद पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. प्रतीवर्षी येथील विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी नांदेड ते कोरेगाव भीमा अशा मोटारसायकल अभिवादन फेरीचे आयोजन करण्यात येते; मात्र या वर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर घरून मानवंदना देण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले होते. फेरीचे प्रमुख श्याम निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून प्रारंभ झाला. त्या वेळी पोलिसांनी या फेरीला प्रतिबंध करून श्याम निलंगेकर यांच्यासह १७ कार्यकर्त्यांना कह्यात घेतले.