धवडकी (सावंतवाडी) येथील श्री दत्तमंदिर

संकलक : श्री. अनिल कोरगावकर, धवडकी, सावंतवाडी

सावंतवाडी येथील कै. बाबी अंधारी यांच्या हस्ते १३ डिसेंबर १९४५ या दिवशी धवडकी येथे सावंतवाडी-बेळगाव राज्यमार्गाच्या बाजूला औदुंबर वृक्षाखाली एका घुमटीत श्री दत्तगुरूंची मूर्ती स्थापन करण्यात आली. त्या वेळी कै. दत्ताराम बाबुराव म्हाडगुत यांनी घुमटीच्या समोर प्रत्येक मासात पौर्णिमेला श्री सत्यनारायणाची पूजा करणे चालू केले. या पूजेचे पुजारी म्हणून सांगेलीचे भागवत कुटुंबीय, तर यजमान म्हणून धवडकी येथील म्हाडगुत कुटुंबीय होते. या कुटुंबियांनी हे व्रत अखंड चालू ठेवले आहे. त्यांना श्री. सूर्यकांत पानोळकर आणि धवडकीचे ग्रामस्थ यांनी सहकार्य केले.

घुमटीच्या ठिकाणी मंदिर उभारण्यासाठी सावंतवाडी येथील प्रसिद्ध विडी व्यापारी कै. फटू पोकळे यांनी साहाय्य केले. वर्ष १९८५ मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्यानंतर मंदिरात वर्ष १९९५ मध्ये श्री गणेशमूर्ती आणि वर्ष २००६ मध्ये हनुमानाची मूर्ती स्थापन करण्यात आली. मंदिरात दत्तजयंतीसह प्रत्येक पौर्णिमेला श्री सत्यनारायण पूजा, हनुमान जयंती, श्रावण मासातील संकष्टी, प.पू. कोंडुरकर महाराज पुण्यतिथी, गुरुद्वादशी, श्री गणेश जयंती यांसारखे उत्सव साजरे केले जातात. यावर्षी दत्तजयंतीनिमित्त २९ डिसेंबरला पहाटे दत्तगुरूंची महापूजा, सायंकाळी ह.भ.प. परब यांचे कीर्तन, त्यानंतर दत्तजन्मसोहळा, भजन, सायंकाळी पालखी प्रदक्षिणा, रात्री नाट्यप्रयोग, ३० डिसेंबरला पहाटे दत्तगुरूंची विधीवत पूजा आणि दुपारी महाप्रसाद झाल्यावर कार्यक्रमाची सांगता होणार आहे. या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोरोनाविषयीचे नियम पाळण्याचे आवाहन

यावर्षी कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे ‘उत्सवाच्या दिवशी भाविकांनी गर्दी न करता कोरोनाविषयीचे नियम पाळून दर्शन घ्यावे’, असे आवाहन करण्यात आले आहे.