महाराष्ट्रातील गुढीचे लिखित साहित्यिक संदर्भ

१. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीत अध्याय ४, ६ आणि १४ मध्ये 

अधर्माचि अवधी तोडीं । दोषांचीं लिहिलीं फाडीं ।
सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवीं ॥ ५० ॥

ऐकें संन्यासी आणि योगी । ऐसी एक्यवाक्यतेची जगीं ।
गुढी उभविली अनेगीं । शास्त्रांतरी ॥ ५२ ॥

माझी अवसरी ते फेडी । विजयाची सांगें गुढी ।
येरु जीवीं म्हणे सांडीं । गोठी यिया ॥ ४१० ॥

२. संत नामदेव, संत जनाबाई आणि संत चोखामेळा या सर्वांच्या लेखनांत गुढीचे उल्लेख येतात. संत चोखोबा त्यांच्या अभंगात म्हणतात

टाळी वाजवावी गुढी उभारावी । वाट हे चालावी पंढरीची ॥१॥

३. १६ व्या शतकातील संत एकनाथांच्या धार्मिक काव्यात तर गुढी हा शब्द असंख्य वेळा अवतरतो. त्यांच्या वेगवेगळ्या काव्यांतून संत एकनाथ हर्षाची उभवी गुढी, ज्ञातेपणाची, भक्तीसाम्राज्य, यशाची, रामराज्याची रोकडी, भक्तीची, जैताची, वैराग्याची, भावार्थाची, स्वानंदाची, सायुज्याची, निजधर्माची इत्यादींच्या गुढ्यांची रूपके वापरतांना आढळतात. संत एकनाथांना या गुढ्यांची अनुभूती त्यांच्या रोमांत होते, कीर्तनी होते, ते गुढी तिन्ही लोकीं, वैकुंठीं उभारण्याचेही उल्लेख करतात; पण मुख्य म्हणजे रणांगणी उभारली जाण्याचाही उल्लेख करतात.

संत एकनाथांच्या लेखनातील गुढी रणांगणी वापरली जात असल्याचा उल्लेख महत्त्वाचा आहे.

४. महाराष्ट्रीय शब्दकोश अभ्यासल्यास गुढी उजवी देणें म्हणजे विनंती मान्य करणें, संमती देणे, मान्यता देणे आणि गुढी डावी देणे म्हणजे विनंती अमान्य करणे, नापसंत करणे, नाही म्हणणे. असे संकेत शालिवाहन आणि त्या नंतरच्या रणांगणात महाराष्ट्रीयन सैन्याने वापरले असल्यास ते तत्कालीन युद्धाच्या व्युहातील महत्त्वाचे, कदाचित निर्णायक संदेश साधन असावे.

५. ‘तुकाराम गाथे’तील संत तुकारामांच्या ४५२९ क्रमांकाच्या अभंगात ते म्हणतात

पुढें पाठविलें गोविंदें गोपाळां । देउनि चपळां हातीं गुढी ॥२॥

६. १६ व्या शतकातील विष्णुदास नामा यांच्या अभंगात गुढीपाढव्याच्या दिवसाचा उल्लेख ‘गुढीयेसी’ असा होतांना रामाच्या अयोध्येस परत येण्याच्या प्रसंगाशी या अभंगात संगती लावली गेल्याचे दिसते, तो अभंग असा

आनंदु वो माये नगरी उत्सवो । आजि येईल रामरावो ॥
मोतिया तांदुळ कांडिती बाळा । गाती वेळोवेळा रामचंद्र ॥

अजिंक्य जिंकोनी आले कौसल्यानंदन । धन्य आजि दिन सोनियाचा ॥
कनक दंड चवर्‍या ढळताती रामा । विष्णुदास नामा गुढीयेसी ।।

७. अर्वाचीन साहित्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी त्यांच्या ‘गुढी उभारनी’ या कवितेतून गुढीपाडव्याचे खालील प्रकारे वर्णन करतात. अहिराणी बोलीचे अभ्यासक डॉ. सुधीर देवरे यांच्या मतानुसार बहिणाबाई चौधरी यांची ही काव्यरचना कान्हादेशातील लेवा पाटीदार गणबोलीत आहे.

आरंभ होई चैत्रमासीचा गुढ्या-तोरणे सण उत्साहाचा

गुढीपाडव्याचा सन ।
आतां उभारा रे गुढी ।।

नव्या वरसाचं देनं ।
सोडा मनांतली आढी ।।

गेलसालीं गेली आढी ।
आतां पाडवा पाडवा ।।

तुम्ही येरांयेरांवरी ।
लोभ वाढवा वाढवा ।।

(साभार : ‘संतसाहित्य’चे संकेतस्थळ)