आज गुढीपाडवा ! आज नवीन वर्षारंभ. म्हणजे जुने टाकून नवीनाचा अंगीकार करणे. सृष्टीत आजपासून नवीन सृजन होणार आहे. म्हणजेच पुन्हा एक परिवर्तन होणार आहे. परिवर्तन हा सृष्टीचा नियमच आहे. प्रकृतीमध्ये ६ ऋतू आहेत. प्रत्येक ऋतुनंतर दुसरा ऋतु येत असतो, हेही एक परिवर्तन असते. सूर्योदय झाल्यानंतर दुपारी सूर्य माथ्यावर येतो आणि सायंकाळी सूर्यास्त होतो आणि रात्र चालू होते. दिवसभर परिवर्तन होत असते. सृष्टीमध्ये ज्याप्रमाणे परिवर्तन होत असते, तसेच व्यक्ती, समाज, संस्कृती, राष्ट्र आदींमध्येही काळानुसार परिवर्तन होत असते; मग त्यात चांगले किंवा वाईट परिवर्तन किंवा पालट असे त्याला म्हणता येऊ शकते, उदा. वातावरणात आज ‘ग्लोबल वॉर्मिंग’मुळे (जागतिक तापमान वाढीमुळे) जो काही पालट झाला आहे, तो पृथ्वीच्या आणि पर्यायाने सृष्टीच्या विनाशाला कारणीभूत ठरू लागला आहे, हे कुणीही नाकारू शकत नाही. ग्लोबल वॉर्मिंगपासून वाचण्यासाठी सर्वच देश आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. त्यात भारतही मागे नाही.

व्यक्तीमध्येही परिवर्तन होत असते. वयानुरूप प्रत्येकात पालट होत असतो. बालक, किशोर, तरुण, गृहस्थ, वयोवृद्ध अशा टप्प्यांत मनुष्यामध्ये पालट होत असतो. समाजामध्ये पालट होतांना विविध घटना कारणीभूत रहातात, त्यात काळ हा सर्वांत महत्त्वाचा भाग असतो. काळानुसार व्यक्ती, समाज आदींमध्ये पालट होत असतात, उदा. १ सहस्र वर्षांपूर्वी म्हणजे मुसलमान आक्रमक आणि इंग्रज भारतात येण्याच्या पूर्वी भारत जगाचा विश्वगुरु होता. भारताचे सकल राष्ट्रीय उत्पन्न २८ टक्के होते. येथे प्रगल्भ आणि संपन्न संस्कृती नांदत होती. भारतातील प्राचीन स्मारके, मंदिरे पाहिल्यावर आपल्या प्रत्येकाला त्याची प्रचीती येत असते; मात्र १ सहस्र वर्षांनंतर जेव्हा आज आपण त्याचा विचार करतो, तर आपण ते सर्वच गमावले आहे, असे लक्षात येते. याला आध्यात्मिक स्तरावर पाहिल्यावर काळाचा महिमा, असेच म्हणावे लागते. हे कालचक्र लक्षात घ्यावे लागेल. हिंदु धर्मशास्त्रानुसार सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि आताचे कलियुग अशी युगे आहेत. या युगांमधील व्यक्ती, समाज आदींची स्थिती वेगवेगळी असते, हे आपण पौराणिक ग्रंथांतून वाचलेले आहे. प्रत्येक युगामध्ये लहान लहान युगांचेही चक्र चालू असते. या युग पालटाला आपण उत्क्रांती म्हणू शकतो. त्यामध्ये सर्वच स्तरांवर पालट होत असतो मग ती राज्यव्यवस्था, प्रशासनव्यवस्था, शिक्षणव्यवस्था, व्यापार आदींमध्ये आमूलाग्र पालट होतो. पूर्वीच्या काळी धर्माधिष्ठित राज्यव्यवस्था होती आणि धर्मनिरपेक्षता आली आहे.
पूर्वी नैसर्गिक शेती केली जात होती. आताच्या काळात रासायनिक खतांचा वापर केला जाऊ लागला. आज त्याचे दुष्परिणाम लक्षात आल्यावर समाज पुन्हा नैसर्गिक शेतीकडे वळू लागला आहे. पूर्वीच्या काळात भारतात गुरुकुल पद्धत होती. आज आपण कारकून बनवणारी शिक्षणपद्धत पहात आहोत. हे असे परिवर्तन समाजामध्ये अव्याहतपणे चालू रहाते. या सर्वच स्थितीकडे पहाता मनुष्याने स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणणे आवश्यक असते. मनुष्य जन्माचे उद्दिष्ट, हे ज्या ईश्वरापासून आपण जन्माला आलो आहोत, त्या ईश्वराशी पुन्हा एकरूप होणे म्हणजे आध्यात्मिक उन्नती करून घेऊन स्वतःला ईश्वरी चैतन्यात परिवर्तित करणे आवश्यक असते. हे केल्यास जिवाचे कल्याण होते.
आपण आपल्या जीवनात हे शाश्वत परिवर्तन घडवून आणण्यासाठी साधना केली पाहिजे, अन्य परिवर्तन हे अशाश्वत आहे, हे ज्ञान झाले पाहिजे. असे परिवर्तन व्यक्तीमध्ये झाले, तर त्याचा परिणाम समाज, संस्कृती, राष्ट्र यांवर होतो आणि ते एक प्रकारचे सत्ययुग असते. काळानुसार आणि अनेक द्रष्टे संत सांगत आहेत, त्यानुसार पुन्हा कलियुगांतर्गत एक सत्ययुग येणार आहे. हे परिवर्तन होणार आहे. भारत पुन्हा विश्वगुरु पदावर स्थानापन्न होणार आहे.
– श्री. प्रशांत कोयंडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.३.२०२५)