गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा सण आहे. हिंदु धर्मातील पहिला सण असून या दिवसापासून नवीन वर्षाला प्रारंभ होतो. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून हिंदु नववर्ष साजरे केले जाते.
गुढीपाडव्याला संवत्सर पाडवो, युगादी म्हणूनही ओळखले जाते. या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी, नवा व्यवसाय, वास्तूशांती, गृहप्रवेश, लग्न आणि इतर अनेक शुभकार्ये केली जातात. महाराष्ट्रातील अनेक घरांच्या दारात गुढी उभारली जाते. दारात उभारलेल्या गुढीला विजय आणि समृद्धी यांचे प्रतीक मानले जाते. गुढीपाडवा कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यांत युगादी किंवा उगादी या नावाने साजरा केला जातो. पडव, पाडवो या संस्कृत शब्दाचा मराठी अपभ्रंश ‘पाडवा’. या शब्दाचा मराठी अर्थ चंद्राची कला. चैत्र शुक्ल प्रतिपदेनंतर चंद्र कलेकलेने वाढतो म्हणून याला चैत्रपाडवा असेसुद्धा म्हटले जाते.
गुढी म्हणजे ध्वज आणि प्रतिपदेच्या तिथीला पाडवा म्हणतात, तसेच हा दिवस सुगीच्या दिवसाचे प्रतीकही मानले जाते. या दिवशी भगवान विष्णु आणि ब्रह्मदेव यांची पूजा केली जाते. हा सण विशेषत: कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश येथे साजरा केला जातो.
गुढीपाडव्याचे महत्त्व
पौराणिक कथेनुसार, गुढीपाडव्याचा दिवस विश्वाची निर्मिती म्हणून साजरा केला जातो. या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली असे मानले जाते. त्यामुळे या दिवशी ब्रह्मदेवाच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय घुसखोरांचा युद्धात पराभव केला होता. असे म्हणतात की, गुढीपाडव्याच्या दिवशी वाईट गोष्टींचा अंत होतो, तसेच जीवनात सुख-समृद्धी येते.
– कोमल दामुद्रे
(साभार : ‘साम’ वृत्तवाहिनी)