‘अ‍ॅप’मध्ये मराठी भाषेचा समावेश करण्याची अ‍ॅमझॉनची सिद्धता

मनसेने दिलेल्या दणक्याचा परिणाम !

मनसे’चे अध्यक्ष राज ठाकरे आणि ॲमेझाॅनचे संस्थापक जेफ बेझॉस

मुंबई – अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्याच्या मनसेची विनंती डावलून मनसेविरुद्ध थेट न्यायालयात याचिका प्रविष्ट करणार्‍या अ‍ॅमेझॉनने आता येत्या ७ दिवसांत अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्याची सिद्धता दर्शवली आहे. संकेतस्थळ आणि भ्रमणभाष यांच्या अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्याचे आश्‍वासन अ‍ॅमेझॉनकडून मनसेला देण्यात आले आहे, अशी माहिती मनसेकडून देण्यात आली आहे.

यापूर्वी मनसेने दिलेल्या चेतावणीनंतर अ‍ॅमेझॉनने मनसेच्या विरोधात दिंडोशी येथील दिवाणी न्यायालयात याचिका केली आहे. त्यावर न्यायालयाकडून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि काही पदाधिकारी यांना नोटीस पाठवण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी अ‍ॅमेझॉनच्या पुणे आणि मुंबई येथील कार्यालयांची तोडफोड केली.

यामुळे आता अ‍ॅमेझॉनने नरमाईची भूमिका घेतली आहे. या प्रकरणी अ‍ॅमेझॉनने क्षमा मागावी, अशी भूमिका मनसेने घेतली आहे. याविषयी अ‍ॅमेझॉनचे अधिकारी आणि मनसेचे नेते यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा होण्याची शक्यता आहे.