‘शिवराज्याभिषेक आणि हिंदुसाम्राज्य विस्तार’, यांविषयी प्रसिद्ध होणारी लेखमाला !
सगळे हिंदु सहिष्णुच आहेत. सहिष्णुता हा हिंदूंचा नैसर्गिक गुण आहे. ‘दुसर्यांच्या मतांचा, भावनांचा, श्रद्धास्थानांचा आदर राखावा’, असे संस्कार हिंदु संस्कृती करते. ‘सहिष्णु असणे याचा अर्थ अन्याय सहन करणे’, असा होत नाही, तसेच हिंदूंनी त्यांच्या श्रद्धास्थानांविषयी श्रद्धा, आदर बाळगायचा नाही, असाही सहिष्णुतेचा अर्थ होत नाही. ‘आततायी माणसाला सन्मानाने वागवावे’, अशी शिकवण हिंदु संस्कृती देत नाही. ‘सहिष्णुता’ आणि ‘सर्वधर्मसमभाव’ हे दोन शब्द भिन्न आहेत. ‘सगळे धर्म सारखीच शिकवण देतात’, हा भ्रम आहे.
१. छत्रपती शिवराय यांच्या दृष्टीने सहिष्णुतेची व्याख्या
छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदु धर्म आणि हिंदु संस्कृती यांचा जाज्वल्य अभिमान बाळगतांना कुणाची पर्वा केली नाही. त्यांच्या राजवटीत वेदांचे अध्ययन करणार्यांना उदरनिर्वाहासाठी प्रतिवर्षी धान्य दिले जात होते. पंचांग हे हिंदूंचे शास्त्रशुद्ध कालमापन आहे. याच कालमापनावर हिंदूंचे सर्व सण, उत्सव, साजरे केले जातात.

छत्रपती शिवरायांच्या काळात ‘कृष्ण ज्योतिषी’ या नावाचा एक विद्वान होता. त्याने छत्रपती शिवरायांच्या आज्ञेवरून ‘करणकौस्तुभ’ नावाचा एक संस्कृत ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ पंचांग शुद्धीकरता लिहिण्यात आला होता. छत्रपती शिवरायांना संस्कृत भाषेबद्दल श्रद्धा होती. त्यांची मुद्रासुद्धा संस्कृत भाषेतच होती.
‘राक्षसी प्रवृत्ती आणि विकृती यांच्या समोर सहिष्णुता उपयोगी पडत नाही’, हे छत्रपती शिवरायांनी जाणले होते. ‘सहिष्णु असणे म्हणजे अन्याय अत्याचाराविरुद्ध गप्प बसणे’, असा जो आज अर्थ लावला जातो, तसा सहिष्णु या शब्दाचा अर्थ नाही. ‘सज्जनांशी सज्जनतेने वागणे; दुष्ट दुर्जनांना शासन करून शांतता, सुव्यवस्था आणि न्याय प्रस्थापित करणे’, याचा अर्थ सहिष्णुता असा आहे. या व्याख्येनुसार छत्रपती शिवराय सहिष्णू होते.
२. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दृष्टीने सहिष्णुता कोणती ?
इतर धर्मियांना त्यांचा धर्म त्यांची संस्कृती प्रिय आणि श्रेष्ठ आहे. त्यांनी त्यांचा धर्म आणि त्यांची संस्कृती यांच्याविषयी आदर बाळगला, तर ते असहिष्णु ठरत नाहीत; पण हिंदूंनी त्यांच्या प्रिय धर्माचा आणि संस्कृतीचा अभिमान बाळगला, तर मात्र लगेचच हिंदूंना असहिष्णु ठरवले जाते. हा न्याय नसून ही हिंदु धर्म आणि संस्कृती यांविषयी जोपासलेली द्वेषभावना आहे. अशा द्वेषभावनेला फसून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा धर्म आणि संस्कृती यांविषयी अनास्था दाखवली नाही. याचाच अर्थ ‘अन्य धर्मांविषयी आदरभाव व्यक्त करायचा आणि स्वधर्माविषयी अनास्था बाळगयची’, असा सहिष्णुतेचा अर्थ होत नाही. ‘पुतना मावशीची खणा नारळाने ओटी न भरणे’, हीच हिंदूंची सहिष्णुता आहे. छत्रपती शिवाजी महाराज यादृष्टीनेच सहिष्णु होते, असे आपण ठामपणे म्हणू शकतो.
३. छत्रपती शिवरायांचे ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापनेचे उद्दिष्ट साध्य झाले का ?
छत्रपती संभाजी महाराज यांनी मिर्झाराजे जयसिंग यांचा मुलगा रामसिंह याला एक पत्र लिहिले, ‘सध्या औरंगजेबाला सर्व हिंदू सत्त्वशून्य आणि स्वधर्महीन झाले आहेत, असे वाटते. आम्ही धर्म आणि प्रजापालन यांविषयी राजधर्मापासून दूर जाऊ इच्छित नाही. यवनांच्या विरोधात युद्ध करण्यासाठी आम्ही आमचा खजिना, देश, गड आणि सारे काही पणाला लावायला सिद्ध आहोत. औरंगजेबाला कारागृहात टाकून श्रींची स्थापना करण्याची आणि सर्व धर्म कृत्यांचे प्रवर्तन करण्याची वेळ आली आहे. तुम्हीसुद्धा यवनांना धडा शिकवण्यासाठी धाडस दाखवले पाहिजे, तरच निभाव लागेल. स्वधर्माचा त्याग करून तुम्ही जेव्हा स्वस्थ बसता त्या वेळी आम्हाला त्याचे नवल वाटते.”
याचा अर्थ ‘प्रत्येक हिंदूने कधीही अकर्मण्यता वृत्तीने वागायचे नाही’, असा होतो. राष्ट्ररक्षण, राष्ट्र-धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी २४ घंटे प्रत्येक हिंदूने सज्ज असले पाहिजे. ही वृत्ती जोपर्यंत हिंदु समाजात जिवंत आहे, तोपर्यंत छत्रपती शिवरायांच्या ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापनेचे उद्दिष्ट अबाधित रहाणार, याची निश्चिती आहे.
छत्रपती राजाराम महाराज यांनी हनुमंतराव घोरपडे यांना ४ जून १६९१ या दिवशी एक पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी ‘महाराष्ट्र धर्माचे पूर्ण रक्षण करावे’, असे म्हटले आहे. राजाराम महाराज वयाच्या ३२ व्या वर्षी देहली जिंकण्याची मनीषा बाळगतात. त्या वेळी त्यांच्या मनात समर्थ रामदासस्वामींचे ‘महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे’, हे वचन खोलवर रुजले असल्याची प्रचीती येते. त्याचप्रमाणे छत्रपती शिवरायांनी जे ध्येय मराठ्यांसमोर ठेवले, त्या ध्येयपूर्तीसाठी शौर्य गाजवण्याचे धाडस शिवरायांची हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ त्यांना देत असते. ‘छत्रपती शिवाजी महाराज नसते, तर सर्वांची सुंता झाली असती’, हे कवी भूषण यांचे हे वचन आजही आपल्या शिवरायांचे उद्दिष्ट दुर्लक्षित झाले, असे सांगत नाही. ‘हिंदुस्थान हे हिंदु राष्ट्र आहे’, असे घोषित करण्याचा आग्रह आजची हिंदु जनता करते, हे त्याचेच द्योतक आहे.
४. पानिपत युद्धात कोण जिंकले ? कोण हरले ?
पानिपतच्या युद्धात हिंदु लोक आणि त्यांची कुटुंबे यांच्यावर भयंकर प्रसंग ओढवला. दुःखाचा डोंगर कोसळला. तरीसुद्धा युद्धात कामी आलेल्या सैनिकांचा प्रतिशोध घेण्याची उत्कंठा मराठ्यांमध्ये दुपटीने वाढली. त्यांनी उत्तरेतील सर्व हिंदु राज्यांना आवाहनाची पत्र पाठवली, ‘शत्रूचा समूळ नाश करण्यासाठी सर्व हिंदूंनी एकजूट व्हावे. हिंदू स्वातंत्र्य युद्धात संघटित व्हावे. पानिपतचा पराभव झाला असतांनाही मोगल साम्राज्याच्या विनाशावर दुसरे अधिक बलशाली महंमदी साम्राज्य उभारण्याची अब्दालीची महत्त्वाकांक्षा आपण व्यर्थ करून टाकू.’ अशा प्रकारे कधीही शिथिल न होणार्या चिकाटीमुळे राष्ट्रावर आपत्ती कोसळली असतांना त्या आपत्तीखाली चिरडून न जाता धैर्याने तिला तोंड द्यायच्या मराठ्यांच्या या गुणांमुळे संपूर्ण हिंदुस्थानचे अधिराज्य झाले. स्वतःच्या शत्रूचा स्वभावधर्म न ओळखण्याइतका अब्दाली मूर्ख नव्हता. पानिपतचा विजय मिळाल्यावर त्याने स्वदेशाची वाट धरली; कारण त्याला हे ठाऊक होते की, जे आपण मिळवले आहे, तेसुद्धा आपल्या हातून निघून जाईल.
नानासाहेबांनी पानिपतच्या युद्धात जे बचावले होते, त्या सर्व सैनिकांना आणि अधिकार्यांना एकत्र केले. मल्हारराव होळकर, विठ्ठल शिवदेव नारोशंकर, जानोजी भोसले आणि इतर अनेक सेनानायक ग्वाल्हेरला एका मागून एक गोळा होऊ लागले. त्यांना समवेत घेऊन देहलीवर चालून जाण्याची सिद्धता नानासाहेबांनी केली. मराठ्यांच्या या वागण्याने सुजाउद्दवला आणि नजीबखान दोघांची ही पाचावर धारण बसली. पानिपतचा विजय, म्हणजे मराठ्यांच्या विरुद्ध सर्व युद्ध जिंकणे नाही. याचा अनुभव त्यांना आला. त्यांनी नानासाहेबांशी बोलण्याचा प्रयत्न केला.
अब्दालीला एकट्याने किंवा त्याने सर्वांचे साहाय्य घेऊनसुद्धा हिंदूंचा कायमचा बीमोड करणे किंवा इस्लामी साम्राज्याचा डळमळणारा डोलारा तोलून धरणे शक्य नाही. ही गोष्ट सुजाउद्दवलाच्या लक्षात आली. हळूहळू मुसलमानांचा समूह विभक्त झाला. प्रत्येक जण सुरक्षित स्थळी जाऊ लागला. सुजाउद्दवलाने अब्दालीला सोडले. अब्दाली देहलीला आला. तिथे तो काही आठवडे राहिला. त्यानंतर दक्षिणेकडून ५० सहस्र सैनिकांसह बाळाजीपंत त्याच्या निकट आले. त्याच वेळी इराणच्या शाहने त्याच्या राज्यावर आक्रमण केल्याचे त्याला कळले. त्यामुळे तो अस्वस्थ झाला आणि हिंदुस्थान सोडून मार्च १७६१ मध्ये मायदेशी निघून गेला.
जे महत्त्वाकांक्षी हेतू मनात बाळगून अब्दालीने सिंधू नदी ओलांडून हिंदुस्थानवर आक्रमण केले, त्यापैकी एकही हेतू त्याला साध्य करता आला नाही. अखेरीस धावपळ करून पुन्हा सिंधू नदी ओलांडून त्याला माघार घ्यावी लागली. पानिपतची लढाई जिंकली; पण ती जिंकताना मराठ्यांची प्रबळ हिंदु सत्ता नामशेष करणे अब्दालीला जमले नाही.

पानिपतच्या या विनाशामधून पंजाबमध्ये दुसरी हिंदु सत्ता प्रस्थापित झाली. ती सत्ता, म्हणजे शीख संघाचे उदयोनमुक्त राष्ट्र ! या शूर लोकांनी हळूहळू अशा धर्म संघाची प्रस्थापना केली की, ज्याला वारंवार हुतात्म्यांच्या रक्ताचे पोषण मिळून त्याचे लवकरच प्रबळ राष्ट्र बनणार, असे दिसू लागले. शिखांचे १० वे गुरु गोविंदसिंह आणि वीर हुतात्मा बंदा बैरागी या दोघांची अखिल हिंदूंच्या सर्वश्रेष्ठ राष्ट्रविरांच्या मालिकेत गणना केली गेली. अखिल हिंदू समाजाच्या दृष्टीने पाहिले असता मुसलमानांना त्यांचा हेतू साध्य करता आला नाही.
पानिपतच्या युद्धाबद्दल मेजर इव्हान बॉल लिहितो, ‘पानिपतचा पराभवसुद्धा मराठ्यांना कीर्तीदायक आणि अभिमानास्पद होता. ते हिंदूंच्या कार्यासाठी अखिल हिंदूंच्या वतीने लढले.’ हिंदूंचा पराभव झाला, असे आपण म्हटले, तरी पानिपत ज्यांनी विजय मिळवला, असे म्हटले जाते, त्या यवनांना हिंदुस्थानातून निघून जावे लागले. त्यानंतर पुन्हा त्यांनी हिंदुस्थानच्या कारभारात कधीही ढवळाढवळ केली नाही, म्हणजेच हिंदुस्थानवर पुन्हा वायव्य दिशेकडून कधीही मुसलमानांचे आक्रमण झाले नाही.
(समाप्त)
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली.
संपादकीय भूमिकासज्जनांशी सज्जनतेने वागणे; दुष्ट दुर्जनांना शासन करून शांतता, सुव्यवस्था आणि न्याय प्रस्थापित करणे म्हणजे सहिष्णुता ! |