आपली वास्तू लवकरात लवकर विकली जावी, यासाठी वास्तुदेवतेला प्रार्थना करा, तसेच पुढील उपाय करा !

‘काही साधक आपत्काळाच्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी मोठ्या शहरांतील आपली घरे विकून छोट्या गावांत रहायला जात आहेत. काहींना आपली घरे विकण्यामध्ये अडचणी येत आहेत. त्या दूर होण्यासाठी, तसेच घर लवकरात लवकर विकले जाण्यासाठी साधक पुढील उपाययोजना करू शकतात.

सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ

१. वास्तुदेवतेप्रती कृतज्ञताभाव असणे आणि तिला प्रार्थना करणे आवश्यक !

आपण ज्या घरात इतकी वर्षे राहिलो, त्या घरातील वास्तुदेवतेप्रती आपण कृतज्ञ असले पाहिजे; कारण तिने आपल्याला इतकी वर्षे सांभाळले आहे आणि आपले रक्षण केले आहे. तिचे ऋण आपल्यावर आहेत. वास्तुदेवतेप्रती भाव असेल, तर ती ते घर विकण्यास अनुमती देईल, तसेच घर विकायला साहाय्य करील. तिचे ऋण थोडेतरी फेडण्यासाठी घर विकले जाईपर्यंत वास्तुदेवतेला पुढील प्रार्थना दिवसातून एकदा तरी कराव्यात.

अ. ‘हे वास्तुदेवते, तू इतकी वर्षे ऊन, वारा, पाऊस यांपासून आमचे रक्षण केलेस आणि आम्हाला सांभाळलेस, यासाठी आम्ही तुझ्या चरणी कृतज्ञ आहोत.

आ. तू आम्हाला तुझ्या ऋणांतून मुक्त कर. आमच्याकडून काही चुकले असेल, तर आम्हाला क्षमा कर.

इ. तू आम्हाला ही वास्तू विकायला साहाय्य कर. वास्तू विकण्यातील सर्व अडथळे तू दूर कर. ही वास्तू लवकरात लवकर विकली जाऊ दे आणि आम्ही साधना करण्यासाठी मोकळे होऊ दे.’

२. नामजपाचे मंडल घालून त्यात प्रार्थना लिहिणे

श्रीकृष्णाच्या नामजपाचे (ॐ नमो भगवते वासुदेवाय ।) मंडल कोर्‍या कागदावर चारही बाजूंनी घालावे. त्यामध्ये ज्याच्या नावावर घर असेल, त्याचे नाव लिहून पुढील प्रार्थना लिहू शकतो. पुढील प्रत्येक प्रार्थना वेगवेगळ्या कागदावर नामजपाचे मंडल काढून लिहावी. हा प्रार्थना लिहिलेला कागद देवघर, धार्मिक ग्रंथ अशा पवित्र स्थानी आपली वास्तू विकली जाईपर्यंत ठेवावा. वास्तू विकली गेली की, कृतज्ञता व्यक्त करून तो कागद पाणी किंवा अग्नी यामध्ये विसर्जित करावा.

अ. ‘हे श्रीकृष्णा, माझे नाव …(नाव लिहावे) आहे. माझ्या नावावर असलेले घर लवकरात लवकर विकले जाऊ दे. त्यामध्ये कोणतेही अडथळे नको येऊ दे. घर विकले गेल्याने मला आणि माझ्या कुटुंबियांना साधनेमध्ये पूर्ण लक्ष देता येईल.’

आ. ‘हे श्रीकृष्णा, माझे नाव …(नाव लिहावे) आहे. माझ्या नावावर असलेले हे घर विकत घेण्याच्या उद्देशाने ते पहायला येणार्‍या …..(व्यक्तीचे नाव लिहावे.) या व्यक्तीला हे घर आवडू दे. तू सुचवल्याप्रमाणे ठरवलेल्या रकमेला हे घर विकत घेण्यास ती व्यक्ती राजी होऊ दे. पुढे हा व्यवहार लवकरात लवकर पूर्ण होऊन मला साधनेमध्ये पूर्ण लक्ष देता येऊ दे.’ (समजा, या व्यक्तीने ‘नाही’ म्हटले, तर घर पहायला येणार्‍या दुसर्‍या व्यक्तीसाठी पुन्हा नवीन मंडल घालावे लागेल आणि आधीचा मंडल घातलेला कागद विसर्जित करावा लागेल.)

काही जणांचे घर वडिलोपार्जित असल्याने ते एकापेक्षा अधिक व्यक्तींच्या नावावर असते. यामध्ये त्या प्रत्येकाची घर विकण्यासाठी अनुमती लागते. तसेच ‘त्या प्रत्येकाला घर विकल्यावर किती रकमेचा वाटा द्यायचा ?’, हे ठरवावे लागते. यांमध्ये कोणत्याही व्यक्तीकडून कोणतेही अडथळे येऊ नयेत, यासाठीही नामजपाच्या मंडलामध्ये त्या व्यक्तींची नावे लिहून प्रार्थना लिहू शकतो.’

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (४.११.२०२०)