स्वराज गोमंतक संस्थेकडून वेर्ला येथे महिलांसाठी स्वरक्षण प्रशिक्षण शिबिर

प्रशिक्षक कु. आकांशा तोडकर यांना स्मृतीभेटवस्तू प्रदान करतांना वक्ते प्रा. अनिल सामंत, समवेत श्री. कमलेश बांदेकर (मध्यभागी), आयोजक श्री. सूरज मंत्रवादी आणि श्री. जयेश थळी (सर्वांत डावीकडे)

म्हापसा, २२ डिसेंबर (वार्ता.) – गोवा मुक्तीदिनाचे औचित्य साधून ‘स्वराज गोमंतक’ या संघटनेकडून समाजासाठी विशेषतः महिला आणि युवती यांच्यासाठी अनिवासी स्वरक्षण प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. वेर्ला-काणका येथील सातेरीनगर क्रीडा मैदानात १६ डिसेंबर ते २० डिसेंबर २०२० या कालावधीत हे शिबिर घेण्यात आले. या शिबिराचा प्रारंभ १६ डिसेंबर या दिवशी सायंकाळी ३.३० वाजता झाला. या दिवशी प्रारंभी श्री. जयेश थळी यांनी शिबिराचा उद्देश स्पष्ट केला. श्री. भानुदास बेसरे यांनी स्वागत केले. त्यानंतर स्वराज गोमंतक संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रशांत वाळके यांनी संस्थेच्या कार्याची ओळख करून दिली. या शिबिराला प्रमुख पाहुणे श्री. चंद्रकांत (भाई) पंडित उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सौ. कनश्री मुंज, सौ. आर्या योगी, कु. ऋषिकेश शिरोडकर आणि सुवर्ण परमेकर यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत केले. या वेळी अधिवक्त्या रोशन सामंत यांनी ‘महिलांना स्वरक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता’, या विषयावर मार्गदर्शन केले. शेवटी श्री. सूरज मंत्रवादी यांनी आभार मानले.

१७ ते २० डिसेंबर हे ३ दिवस प्रतिदिन सकाळी ६ ते ८ आणि दुपारी ४ ते सायंकाळी ६ अशा २ सत्रांमध्ये तज्ञ व्यक्तींनी शिबिरार्थींना प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले. या शिबिराच्या समारोपाच्या कार्यक्रमात गडहिंग्लज येथून आलेल्या प्रशिक्षक कु. आकांशा तोडकर यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. अनिल सामंत आणि प्रमुख अतिथी म्हणून भारत स्वाभिमानचे श्री. कमलेश बांदेकर उपस्थित होते. या शिबिरात जवळजवळ ७० प्रशिक्षणार्थी सहभागी झाले. यात प्रामुख्याने महिला आणि युवावर्ग सहभागी झाला होता. लाठीकाठी हे या शिबिराचे विशेष आकर्षण होते. या शिबिरासाठी समन्वयक म्हणून श्री. जयेश थळी, श्री. संजय नायक, सौ. कनश्री मुंज, सौ. आर्या योगी आणि कु. ऋषिकेश शिरोडकर यांनी काम पहिले.